गणेशपुरी जंक्शनवर साकारतेय वाहतूक बेट

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

 म्हापसा शहरातील गणेशपुरी भागातील मुख्य रस्त्यावरील जंक्शनवर सध्या वाहतूक बेट उभारण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. या प्रकल्यासंदर्भात स्थानिक नगरसेवक संजय मिशाळ यांनी सातत्याने पालिकेकडे तसेच ‘रोटरी क्लब ऑफ म्हापसा सीटी’च्या पदाधिकाऱ्यांशी पाठपुरावा केला होता.

म्हापसा : म्हापसा शहरातील गणेशपुरी भागातील मुख्य रस्त्यावरील जंक्शनवर सध्या वाहतूक बेट उभारण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. या प्रकल्यासंदर्भात स्थानिक नगरसेवक संजय मिशाळ यांनी सातत्याने पालिकेकडे तसेच ‘रोटरी क्लब ऑफ म्हापसा सीटी’च्या पदाधिकाऱ्यांशी पाठपुरावा केला होता.

हा प्रकल्प साकार करण्यात ‘रोटरी क्लब ऑफ म्हापसा सीटी’चे म्हापसा नगरपालिकेला सहकार्य लाभले आहे. गणेशपुरी चौक म्हणून परिचित असलेल्या त्या ठिकाणावरील नियोजित वाहतूक बेटावर सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचा निधी ‘रोटरी क्लब ऑफ म्हापसा सीटी’च्या वतीने खर्च केला जाणार आहे. क्लबच्या ‘सीएसआर’ उपक्रमाच्या अंतर्गत हा प्रकल्य हाती घेण्यात आला आहे.

गणेशपुरी येथील जंक्शनच्या मार्गावरून गेल्या सुमारे दहा वर्षांपासून रहदारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पेडणे तालुक्यातून केरी, पालये, हरमल, मांद्रे, कोरगाव, पार्से, मोरजी, आगरवाडा इत्यादी भागांतून म्हापसा शहरापर्यत येणारे लोक शिवोली ते म्हापसा दरम्यान मार्गक्रमण करताना कमी अंतराचा रस्ता म्हणून गणेशपुरीमार्गेच म्हापशात येणे पसंत करतात; तथापि, त्या गणेशपुरी चौकाच्या परिसरात रस्त्यालगत असलेल्या नियमबाह्य दुकानांमुळे तसेच तेथील मार्गावर द्विभाजक अथवा तत्सम सोय नसल्याने त्या भागात वाहने चालवणे धोकादायक तथा जीवघेणे ठरले आहे.

स्थानिक नागरिकांच्या सूचनेनुसार तसेच त्या मार्गावरून नित्यनेमाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या मागणीनुसार स्थानिक नगरसेवक संजय मिशाळ यांनी त्या ठिकाणी वाहतूक बेट उभारण्याची सूचना म्हापसा पालिका मंडळासमोर केली होती. त्या अनुषंगाने म्हापसा पालिका मंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन ते काम पूर्ण करण्याबाबत शिक्कामोर्तब झाले होते; तथापि, पालिकेच्या तिजोरीत आर्थिक खळखळाट असल्याने ते काम मार्गी लावणे शक्य झाले नव्हते. पालिकेची असलेली नाजूक आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन नगरसेवक संजय मिशाळ यांनी ‘रोटरी क्लब ऑफ म्हापसा सीटी’च्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून हे काम क्लबच्या सामाजिक सेवा उपक्रमाच्या अंतर्गत हाती घेता येईल का, या बाबत निर्णय घ्यावा अशी विनंती त्यांना केली. त्यानुसार या प्रकल्पाला चालना मिळाली आहे. या प्रकल्पासंदर्भात पालिकेने क्लबला परवानगी दिल्याचे नगरसेवक श्री. मिशाळ यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. गणेशपुरी जंक्शनवर वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना असलेला धोका टाळण्यासाठी त्या मार्गालगत असलेली बेकायदा दुकाने हटवून थोडीशी मागे नेण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवक तसेच म्हापसा पालिकेसमोर सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात आली होती; तथापि, त्याबाबत सध्या तरी म्हापसा पालिकेने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. वाहतूक बेट उभारले जात असल्याने येथील वाहन अपघातांना थोडाफार आळा बसेल, असे मत वाहनचालकांनी, पादचाऱ्यांनी तसेच स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.

गणेशपुरी जंक्शनवर सुयोग्य व्यवस्था केल्याने तसेच घेतलेल्या एकंदर खबरदारीमुळे गेल्या सुमारे चार-पाच महिन्यांत कोणताही गंभीर स्वरूपाचा अपघात या भागात घडलेला नाही. पूर्वीप्रमाणे कुठून तरी मार्गावरून मध्येच घुसण्याचे प्रकारही घडले नाहीत. नियोजित वाहतूक बेटामुळे परिसराच्या सौंदर्यीकरणात भर तर पडणारच आहे. त्याचबरोबर, गणेपुरीवासीयांच्या बरोबरीनेच या मार्गावरून जाणाऱ्या खोर्लीवासीयांची, शिवोलीवासीयांची तसेच पेडणेवासीय वाहनचालकांची चांगल्यापैकी सोय होणार आहे.
- संजय मिशाळ, नगरसेवक, गणेशपुरी प्रभाग

संबंधित बातम्या