‘कामगारांनी अन्यायाविरोधात ‘एल्गार’ करा’

‘कामगारांनी अन्यायाविरोधात ‘एल्गार’ करा’
Workers Elgar against in justice

पणजी : सध्या कामगारांवर अनेक ठिकाणी अन्याय होत आहेत. शिवाय कामगारांच्या विरोधात कायदेही निर्माण केले जात आहेत. या सगळ्याला विरोध करण्यासाठी देशभरातील कामगारांनी पुन्हा एकदा संघटित होण्याची गरज आहे. येत्या २६ नोव्हेंबर रोजी देशभरात आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनाला गोव्यातील कामगारांकडूनही भक्कम पाठींबा दिला जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसचे (आयटक) सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी दिली. 

‘आयटक’चा स्थापना दिवस आज (शनिनारी) उत्साहात पणजीत आझाद मैदानावर साजरा करण्यात आला. ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘हम सब एक है’, ‘लाल सलाम’ यांसारख्या घोषणांनी आझाद मैदान दणाणून सोडले.
३१ ऑक्टोबर १९२० साली स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय यांनी फेडरेशनची स्थापना केली. देशाच्या प्रत्येक संघटनेच्या मुळाशी आणि तत्वांशी आयटकचे नाते राहिले आहे. देशाच्या स्वातंत्र्यात योगदान देणारे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, चित्तरंजन दास, नेटज सुभाषचंद्र बोस, सरोजिनी नायडू यांच्यासारखी महान व्यक्तिमत्वे ट्रेंड युनियन काँग्रेसचा भाग होती. आजचा दिवस हा युनियनच्या कार्यासोबत या महान व्यक्तिमत्वांना आंदरांजली वाहण्याचासुद्धा असल्याचे फोन्सेका म्हणाले. 
नोव्हेंबर महिन्यातील आंदोलनात आम्ही काही मागण्या सरकारकडे करणार आहोत. त्यात प्रामुख्याने गरजूंना प्रत्येक महिन्याला १० किलोग्रॅम मोफत धान्यवाटप करावे. कामगार आणि शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे रद्द करावेत. जे लोक टॅक्स भरत नाहीत, त्यांच्या खात्यावर महिन्याला ७५०० रुपयांची रक्कम सरकारने जमा करावी. राज्यातील बेरोजगार कामगारांना काम देण्यात यावे. शिवाय राज्यासह देशभरात सार्वजनिक क्षेत्रांचे जे खासगीकरण सुरु आहे, त्यावर आळा घालण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी शहरातून रॅलीही काढण्यात आली आणि हुतात्म्यांना वंदन करण्यात आले.

मांडण्यात आलेले महत्त्वाचे मुद्दे 
राज्यातील हॉटेलिंग क्षेत्राशी निगडित सुमारे दिड लाख लोकांच्या नोकऱ्या कोरोनाच्या कालावधीत गेल्या आहेत, शिवाय रिक्षा चालक, खासगी बस चालविणारे, प्रयत्न क्षेत्रात काम करणारे अनेक लोक बेकार झाले आहेत. परदेशात काम करणाऱ्या गोवेकर बांधवांच्या नोकऱ्या गेल्याने ते राज्यात परतले आहेत आणि त्यांची कामाची गरज आहे. खाणव्यवसाय बंद झाल्यानंतर सुमारे दोन लाख लोकांचे काम गेले. शिवाय अनेक शालेय तसेच महाविद्यालयीन मुलांना ऑनलाईन शिक्षणाचा ताण आहे. राज्याची आर्थिक अवस्थाही चांगल्या स्थितीत नाही. या सगळ्यामध्ये गरीब माणूसच पुन्हा भरडला जात आहे. सरकारने या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे यावेळी फोन्सेका यांनी सांगितले.
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com