"बाबू आजगावकर यांची लोकविरोधी कृत्ये आता मी वेशीवर टांगणार आहे"

दैनिक गोमन्तक
रविवार, 20 डिसेंबर 2020

मगो पक्षाची पायरी करून भाजप सत्तेवर आला. भाजप हा विश्वासघातकी पक्ष असून मगो पक्षाने जर आगामी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपसोबत युती केली, तर आम्ही पक्षाच्या बाजूने असणार नाही,

पेडणे मगो पक्षाची पायरी करून भाजप सत्तेवर आला. भाजप हा विश्वासघातकी पक्ष असून मगो पक्षाने जर आगामी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपसोबत युती केली, तर आम्ही पक्षाच्या बाजूने असणार नाही, पेडण्यातील मगो पक्षाच्या कार्यकर्त्यांची साथ असणार नाही, असा इशारा माजी आमदार परशुराम कोटकर यांनी मगोच्या सभेत दिला.

उमेश तळवणेकर व उत्तम कशालकर यांच्या मगोत प्रवेशासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, की उमेश तळवणेकर हे  मगोच्याच संस्कारात वाढलेले असून पुनर्प्रवेश  केला त्याचे स्वागत आहे. मागच्या निवडणुकीत आम्ही लोकांच्या हातापाया पडून आमदाराला विजयी केले. मात्र, त्यांनी मगोशी गद्दारी केली. आजगावकर यांच्या विजयासाठी वावरणाऱ्या जीत आरोलकर यांच्या विरोधात त्यावेळी भाजपने चौकशीचे आदेश देऊन स्थानबध्द केले त्याच आजगावकरांनी  भाजपमध्ये जाऊन जीत आरोलकरांविरुद्ध चौकशीत गुरफटविले. आता गद्दारांना संघटीत पणे धडा शिकवूया. 

यावेळी व्यासपीठावर मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, राकेश स्वार, दशरथ महाले, अमृत आगरवडेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर, जीत आरोलकर, कोरगावचे माजी सरपंच सुदीप ढवळीकर, चंद्रशेखर खडपकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर म्हणाले, की मगो हा भाऊसाहेब बांदोडकरांचा पक्ष आहे. भाजप सरकार हुकूमशाही आहे. जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत कमी मतांनी पराभव झाला. मगो पक्षच भाजपला आव्हान देऊ शकतो. यापुढे दोन्ही मतदारसंघात मगोचे पूर्ण लक्ष असणार. दोन्ही आमदारही निवडून आणणार ते काम मतदार करतील असा विश्वास दीपक ढवळीकर यांनी व्यक्त केला. पक्ष आणि निशाणी महत्वाची आहे. मग पक्ष लोकशाही मानणारा आहे. मगो पक्ष एका घराण्याचा नाही, असे सांगून आता उमेश तळवणेकर यांनी काम करावे. रात्र वैऱ्याची आहे सावध राहा. भाजप विधानसभेची निवडणूक उद्यासुद्धा जाहीर  करू शकतो, असेही त्यांनी सांगितले. 

मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी सुरवातीला प्रास्ताविक करताना मगोचे गत वैभव परत मिळवून देण्यासाठी सिंहाचे छावे पक्षात येत आहेत, त्याचे स्वागत करत असतानाच नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत जी मते मिळाली त्यातून विधानसभा निवडणुकीत मगो विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला.
सिंथिया गावकर यांनी सूत्रसंचालन केले, तर स्नेहा कवठणकर, प्राची गडेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी उमेश तळवणेकर व उत्तम कशाळकर यांना मगो पक्षात प्रवेश दिला. मगोत प्रवेश केलेले उमेश तळवणेकर म्हणाले, बाबू आजगावकर यांना निवडून आणण्यासाठी मी जीवाचे रान केले, पण  त्यांनी योग्य ती साथ दिली नाही. त्यांना मी कोरगाव पंचायतीला ग्रामस्थांना एकदिवस द्यावा असे सांगितले. मात्र, त्यांनी नकार दिला. स्वाभिमानी पेडणेकर आता बाबू आजगावकर यांना रेल्वेत बसून मडगावला पाठवणार असा दावा केला. आपण पक्ष सोडून चुकीच्या पक्षात गेलो याचा पश्चाताप होतो आहे. बाबू आजगावकर यांची लोकविरोधी कृत्ये आता मी वेशीवर टांगणार आहे.

समाजाला जर आम्ही न्याय देऊ शकत नाही, तर त्या समाजाचे अध्यक्षपद कशाला असा सवाल उपस्थित केला. जीत आरोलकर म्हणाले, की तळवणेकर यांच्या प्रवेशाने एका व्यक्तीची झोप उडणार आहे. मगो जिल्हा परिषद निवडणूक हरण्यामागची कारणे सर्वांना माहीत आहे. नवीन कार्यकर्त्यांना सांभाळून पक्षाच्या नेत्यांनी घ्यायला हवे. मगोच्या केंद्रीय नेत्यांनी दर दोन महिन्यांनी  कार्यकर्त्यांची एक बैठक घ्यावी.

अमृत आगरवडेकर म्हणाले, की जे रमाकांत खलप व गोपाळराव मयेकर यांना जमले नाही ते ढवळीकर बंधूंनी पक्ष कार्य वाढीस लावून दाखविले आहे. समुद्राला ओहोटी भरती असते तसेच सत्ता ही एका पक्षाकडे कायमस्वरूपी नसते. मात्र यापुढे सिंहाचे चिन्ह असलेले सरकार परत येईल. सिंहाचे छावे पक्ष निष्ठ आहेत, म्हणून दिवसेंदिवस मगोचे अस्तिव कायम राहणार आहे. पुढे पेडण्यातून जित आरोलकर व प्रवीण आर्लेकर विजयी होऊन आमदार बनतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माजी सरपंच सुदीप कोरगावकर यांनी मगोचे नेते कोणत्याही प्रलोभनाला बळी पडत नाही. गरीब समाजाचा कळवळा भाऊसाहेब बांदोडकर यांना होता, म्हणून त्यांनी विकासाचा पाया घातला. तळवणेकर हे बाबू आजगावकर यांना सळो की पळो करून सोडतील. माजी जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर, आत्माराम धारगळकर यांनीही यावेळी विचार मांडले. सिंथिया गावकर यांनी आभार मानले.

आणखी वाचा:

आजच्या दिवशी १९६३ मध्ये गोव्यात पहिले सरकार सत्तारूढ ; दयानंद ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांनी घेतली होती शपथ -

 

संबंधित बातम्या