शिधापत्रिका नसलेल्या कामगारांना दोन महिन्यांची मिळणार तांदूळ-डाळ

dainik gomantak
शनिवार, 23 मे 2020

शुक्रवारी (ता. २२) सकाळी अकरा वाजता केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याशी लाईव्ह चर्चा होणार आहे. त्यात कामगारांना अनेक घरमालकांनी घरभाडे देण्यासाठी त्रास सुरू केला आहे.

पणजी, 

राज्यातून कामगारवर्ग स्थलांतरित होऊ लागला आहे. त्याला अनेक कारणे आहेत, पण जो वर्ग अजूनही परिस्थिती सुधारेल आणि मिळेल ते काम करून जीवन जगत आहे. अशा कामगारांना केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्यावतीने मे आणि जून दोन महिन्यांचा कोटा म्हणून प्रति व्यक्तीस दहा किलो तांदूळ आणि दोन किलो तूरडाळ दिली जाणार असल्याची माहिती राज्य नागरी पुरवठा मंत्री गोविंद गावडे यांनी दिली.
टाळेबंदीमुळे हातावर पोट असलेला कामगार गावाकडे परतू लागला आहे. या कामागारांचे जथ्थेच्या जथ्थे आता प्रत्येक राज्यातून आपापल्या गावाकडे जाऊ लागले आहेत. मिळेल त्या वाहनाने, रेल्वे किंवा चालत या कामगार वर्गाने घराची वाट पकडलेली आहे. परंतु अजूनही काही कामगार प्रत्येक राज्यात आहेत, जे अजूनही स्थिती सुधारेल किंवा मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करीत आहेत. अशा कामगारांना दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारने मे आणि जून महिन्याचा कोटा म्हणून प्रति व्यक्तीस दहा किलो तांदूळ आणि दोन किलो डाळ दिली जाणार आहे, हे सांगून गावडे म्हणाले की, केंद्र सरकारने हा निर्णय घेऊन कामगारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांकडून ज्यांच्याकडे शिधापत्रिका नसलेल्या कामगारांची यादी घेऊन कशापद्धतीने त्यांच्यापर्यंत हे धान्य पोहोचविले जाईल, याचा विचार केला जाईल.
राज्यातून किती लोक आपापल्या गावी परतले आहेत, किती शिल्लक आहेत यांची यादी मिळविली जाईल, असे सांगून गावडे म्हणाले की, शुक्रवारी (ता. २२) सकाळी अकरा वाजता केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याशी लाईव्ह चर्चा होणार आहे. त्यात कामगारांना अनेक घरमालकांनी घरभाडे देण्यासाठी त्रास सुरू केला आहे. त्यामुळे या कामगारांविषयीचा घडभाड्याचा मुद्दा उपस्थित केला जाणार असल्याचे मंत्री गावडे म्हणाले.

 

संबंधित बातम्या