जागतिक आरोग्य संघटनेकडून सावधानतेचा इशारा: हिवाळ्यात मोठी रुग्णवाढ शक्य

प्रतिनिधी
रविवार, 6 सप्टेंबर 2020

हिवाळ्यात कोविड १९ लागण झालेल्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे.

पणजी:  हिवाळ्यात कोविड १९ लागण झालेल्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे. भारतासह अनेक देशांमध्ये हिवाळ्यात कोरोनाचा कहर आणखी वाढणार असल्याचे सांगत संघटनेने त्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. संघटनेच्या संकेतस्थळावरील संदेशात ही माहिती देण्यात आली आहे.

हिवाळ्यामध्ये तरुणांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढेल. त्यामुळे अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागेल. मृत्यूचे प्रमाण देखील वाढेल, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रादेशिक संचालक हेनरी क्‍लग यांनी संदेशात नमूद केले आहे. हिवाळ्यात शाळा पुन्हा सुरू करणे, थंडी आणि वृद्धांचा अधिक मृत्यू या तीन कारणांमुळे संसर्गाचा धोका अधिक वाढू शकतो, असे क्‍लग यांनी म्हटले आहे. 

हिवाळ्यात ही परिस्थिती ओढवणार असल्याने इतर देशांनी त्याला रोखण्यासाठी आताच तयारी करायला हवी व त्यानुसार सावधगिरी बाळगायला हवी, असे हेनरी क्‍लग म्हणाले. पावसाळा तसेच हिवाळ्यातील वातावरण हे संसर्गासाठी अनुकूल असते. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा आकडा पुन्हा वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सध्या सर्व देशांनी हाय अलर्ट असणे आवश्‍यक आहे, असा इशाराही जागतिक संघटनेने दिला आहे. 

प्रत्येक देशांनी योग्य रीतीने पावले उचलली पाहिजेत. वेगवान चाचणी प्रणाली तयार करण्यास प्राधान्य द्यायला हवे. विषाणूच्या संक्रमणावर मात केली, असे ज्या देशांना वाटते त्यांनीही सावधगिरी बाळगावी, अशी सूचना जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. 

दुसरी लाटही येऊ शकते!
कोरोनावरील प्रतिबंधित लस अद्याप आलेली नाही. त्यामुळे जगभरात कोरोना विषाणूची लाट पुन्हा येऊ शकते. हिवाळ्यात हे प्राणघातक ठरू शकते. त्यामुळे प्रत्येक देशाच्या प्रशासनाने आपल्या देशातील नागरिकांसाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या संसर्गजन्य रोगाच्या तज्ज्ञ मारिया केरखोव्ह यांनी नमूद केले आहे.

सरकारने आता अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सरकारच्या नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे. तरच कोविड १९ नियंत्रणात येऊ शकेल, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

दरम्यान, पेडणे तालुक्यातील विविध भागात आज ३२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. झुआरीनगरात पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली असून गेल्या दहा दिवसांत शंभर रुग्णांची भर पडली आहे. डिचोली तालुक्‍यात आज शनिवारी तालुक्‍यात ५० नवीन कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले असून एका महिलेचा बळी गेला. सासष्टी तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे.

अशी घ्या काळजी!

  •   गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
  •   मास्कचा नियमितपणे वापर करा
  •   सामाजिक अंतर पाळा
  •   व्यायाम करा
  •   संतुलित आहार घ्या
  •   रोगप्रतिकारक शक्ती वाढवा
  •   ताप, सर्दी, खोकल्याची लक्षण आढळल्यास डॉक्टरांकडे जा 
  •   साबण, पाणी किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ आणि वारंवार धुवा
  •   डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळा
  •   डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे  घेऊ नका

चोवीस तासांत ९ बळी
राज्यात कोविडची लागण झाल्यामुळे ९ जणांनी गेल्या चोवीस तास प्राण गमावले. यांपैकी ८ जणांना इतर आजार होते. केवळ ६८ वर्षीय एका व्यक्तीचा मृत्यू हा निव्वळ कोविडची लागण झाल्यामुळे झाला आहे. गेल्या २४ तासात ५९२ जणांना कोविडची लागण झाली असून ५३४ जण बरे झाले आहेत. गृह अलगीकरणात आज ४०५ जणांना पाठवण्यात आले. राज्यात आता ४ हजार ९४५ रुग्ण आहेत. आजवर  २० हजार ४५५ जणांना कोविडची लागण झाली आहे त्यापैकी १५ हजार २८१ जणांनी कोविडवर मात करून ते बरे झाले आहेत. कोविडची लागण झाल्यामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या २२९ झाली आहे. सध्या इस्पितळातील अलगीकरण कक्षात १६७ जण आहेत. २ हजार १३१ नमुने आज चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांपैकी २ हजार १०२ नमुन्यांचा अहवाल आज प्राप्त झाला. ४१३ नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे.

संबंधित बातम्या