जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन विशेष: ..तर आत्महत्या टळू शकतात!

दशरथ मोरजकर
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

प्रत्येकाचे समस्या निवारण, भावनांवर नियंत्रण हवे

मोरजी: जर प्रत्येक व्यक्तीला समस्या निवारण कौशल्य, निर्णय घेण्याचे कौशल्य आणि भावना नियंत्रणात ठेवायला हव्यात, त्यासंदर्भात कौशल्यविकास केला तर मोठ्या प्रमाणात आत्महत्या टाळता येतील, अशी माहिती उत्तर गोवा मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे मनोविकार तज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी  केले. 

१० सप्टेंबर हा दिवस जगभर आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून पाळला जातो. आत्महत्या हा आजच्या काळातील महत्त्वाचा आरोग्याचा टाळता येण्याजोगा प्रश्न असूनदेखील तो दुर्लक्षित राहिला आहे. आधुनिकीकरणासोबत जीवन गुंतागुंतीचे बनल्यामुळे समाजात मोठ्या प्रमाणात मानसिक आरोग्याचे प्रश्न उभे राहिले आहेत. आता कोरोना आजार आणि त्या पाठोपाठचे टाळेबंदीमुळे यात भर पडली आहे.
जीवनात अचानक येणारी संकटे, अनाठायी अपेक्षा, यासोबतच उदासीनता, सायकोसिस यांसारखे मानसिक आजार आणि व्यसने यांच्या अनेक लक्षणांपैकी जीवन जगावेसे न वाटणे हे एक लक्षण आहे, असे डॉ. पाटकर म्हणाले. आत्महत्येबाबतचा प्रत्येक इशारा आपण गांभीर्याने घेतला पाहिजे, बऱ्याचदा निराश व्यक्ती अप्रत्यक्ष इशारे देत असते, जसे आजची ही आपली शेवटचीच भेट, पुन्हा कधी आपले दर्शन होईल, असे वाटत नाही, असा इशारा देणाऱ्या व्यक्तीला समजून घेऊन उपचारांसाठी तज्ज्ञांकडे नेणे गरजेचे असते.

नातेवाईक तसेच मित्रमंडळींनी निराश झालेल्या व्यक्तीला ती एकटी नाही. आपण तिच्यासोबत आहोत हे जाणवू द्यावे. निराश व्यक्तीची समस्या तुम्हाला कितीही क्षुल्लक वाटत असली, तरी त्या व्यक्तीसाठी ती गंभीर असते. त्यामुळे ती उडवून लावू नये. त्या व्यक्तीची मानसिक वेदना तुम्हाला समजतेय हे जाणवू द्यावे.

आत्महत्येचा विचार हा व्यक्तीच्या अगतिकतेतून आलेला विचार असतो. ती मदतीसाठी मारलेली आर्त हाक असू शकते, तो अन्यायाचा निषेध असू शकतो. त्यामुळे अशा व्यक्तीकडे सहानुभूतीने पाहण्याची गरज असल्याचे डॉ. पाटकर म्हणाले.

समाजात भावनिक बंध मजबूत असतील, जसे एकत्र कुटुंब पद्धती, पूर्वीसारखी ग्रामव्यवस्था (जिथे सगळेच सगळ्यांना ओळखत होते) घनिष्ठ मैत्री तर एकटेपणा, निराशा, निरागसता, जीवनात रस न वाटणे या गोष्टी खूप प्रमाणात कमी होतील. आजच्या या दिनाच्या निमित्ताने आपण समाजातील भावनिक बांध पुन्हा घट्ट करण्याचा प्रयत्न करूया. ज्याला कशासाठी जगायचे याचा उलगडा झाला, तो कोणत्याही परिस्थितीत जगू शकतो, असे तत्त्ववेत्ता '' नित्शे'' यांनी सांगितले आहे, अशी माहिती असे आवाहन डॉ. पाटकर यांनी केले.

संबंधित बातम्या