World Wildlife Day 2023
World Wildlife Day 2023Dainik Gomantak

World Wildlife Day 2023 : मॅन VS वाईल्‍ड

लोकसहभागातून वन्यजीव संरक्षण व्‍हावे

राजेंद्र केरकर (पर्यावरण अभ्‍यासक)

World Wildlife Day 2023 : आज जागतिक वन्यजीव दिन. संपूर्ण जगभर हा दिवस वन्यजीवांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी साजरा केला जातो. आज जगभरात वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष विकोपाला गेलेला आहे.

भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांत अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने यांचे संवर्धन करण्यासाठी राखीव क्षेत्रांची निर्मिती केलेली असली, तरीही वन्यजीव एकंदर आज जगण्यासाठी संघर्ष करत आहेत.

व्यासारख्या राज्यात जेथे पश्चिम घाटातल्या बहुतांश जंगल क्षेत्राचे संरक्षण झालेले आहे. कायदेशीररीत्या जेथे वन्यजीवांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध राहायला हवे, तेथे आज मानव आणि वन्यजीव यांचा संघर्ष विकोपाला गेलेला दिसतो.

शेतीबागायतींची नासधूस वन्यजीव करतात हे कारण पुढे करून माणूस वन्यजीवांच्या जीवावर उठलेला आहे. 2009 ते 2021 या कालखंडात गोव्यात पाच वाघांचा मृत्यू झालेला आहे. हे मृत्यू नैसर्गिकरीत्या झालेले नसून त्यामागे मानवी क्रौर्य आहे.

वाघांबरोबरच आज मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा मृत्यू भटक्या कुत्र्यांगत ठिकठिकाणी होऊ लागलेला आहे. एकेकाळी माणूस आणि वन्यजीव यांच्यात असलेले सौहार्दाचे संबंध बिघडू लागलेले आहेत याची साक्षच या घटना देतात.

World Wildlife Day 2023
गोव्याच्या किनारपट्टीला चक्रीवादळचा फटका तर..., पाहा बचावकार्याची मॉक ड्रिल

गवे, रानडुक्कर, साळींदर, शेकरू यांसारखे प्राणी शेतकऱ्यांना त्यांच्या अन्नधान्याची नासधूस करण्याच्या दृष्टीने कारणीभूत ठरू लागलेले आहेत.

एकेकाळी शेकरू, सांबर या प्राण्यांना निष्पाप मानणारा समाज आज त्यांच्याकडून शेती आणि बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याकारणाने त्यांना उपद्रवकारक घोषित करण्याची मागणी करू लागलेला आहे. अशा तृणहरी प्राण्यांना उपद्रवकारक घोषित करून हा प्रश्न सुटणे कठीण आहे.

रानडुक्कर, साळींदर अशा जंगली प्राण्यांसाठी कंदमुळे, त्याचप्रमाणे जंगलातील चिवार, कणक आदींचे कोवळे कोंब खाण्यासाठी उपलब्ध असायचे. अशा कोंबांना आता बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी वाढू लागल्याने हे रानवैभव ओरबाडून विक्रीसाठी बाजारात आणले जाऊ लागले आहे.

प्राण्यांचे खाद्यच कमी झाल्याने प्राण्यांनी आपला मोर्चा काटेकणगी, माडी, करांदे अशा कंदवर्गीय पिकाकडे वळविलेला आहे. आज गोव्यातील सांगे, केपे, सत्तरी, काणकोण, पेडणे आदी भागातील लागवडीचे जंगली प्राणी नुकसान करत असल्याने शेतकरी त्रस्त झालेले आहेत.

World Wildlife Day 2023
बेरोजगारीत 'गोवा' देशात 'टॉप टेन'मध्ये; राज्यात बेरोजगारी दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त

गोव्यातील सह्याद्रीचे जंगल हे एकेकाळी पट्टेरी वाघांसाठी नावारूपाला आले होते. आपल्या पिकांची नासधूस वाघाने करता कामा नये म्हणून सांगेच्या सीमेवरती वाघडोंगर तर सत्तरीतल्या गावाच्या सीमेवरती ‘वाघेरी’ अशा प्रकारचे डोंगर लोकमानसानी राखून ठेवले होते.

आज वाघेरीचा डोंगर अविवेकी पर्यावरणीय प्रकल्पांची उभारणी करण्यासाठी होणाऱ्या जंगलतोडीने ग्रस्त आहे. ज्या वन खात्याने जंगल आणि त्यातल्या जंगली प्राण्यांची रक्षा करणे गरजेचे होते त्यांच्याकडून कर्तव्य बजावण्याच्या दृष्टीने कसूर होत असल्याने या प्राण्यांची‌ परिस्थिती बिकट झालेली आहे.

1999 मध्ये म्हादई अभयारण्याची अधिसूचना काढण्यात आली; परंतु त्यानंतर या अभयारण्याचे संवर्धन आणि संरक्षण हवे तसे झाले नाही.

उलट मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड रोखली जावी यासाठी वन खात्याकडून शिकार प्रतिबंधक पथकाची स्थापना कॅमेरा ट्रॅप तंत्रज्ञानाद्वारे वाघांच्या हालचालींवरती नजर ठेवणे, त्याचप्रमाणे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून वन खात्यातर्फे कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत.

याकडे लक्ष द्यायलाच हवे...

  • जंगलात पाणवठ्यांची

  • जागोजागी निर्मिती व्हावी

  • नियंत्रित माळरानावरती पाळीव प्राण्यांसाठी चरण्याची सोय

  • तृणहारी जंगली श्वापदांसाठी हंगामी गवतांच्या पैदासीला बाव

  • अभयारण्य आणि अभयारण्याच्या क्षेत्राच्या परिसरात शिकार प्रतिबंध कृती दल कार्यतत्पर करणे.

  • ठिकठिकाणी वनक्षेत्रात उभारलेले निरीक्षण मनोरे कार्यप्रवण करणे.

  • जंगलात ‘पाणी अडवा आणि पाणी जिरवा’ मोहीम राबविणे वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवण्याला विशेष प्राधान्य देणे.

पट्टेरी वाघांना जपा

गेल्या पावशतकापासून सतत पट्टेरी वाघांचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झालेले असताना वन खात्याने त्यांचे संरक्षण करण्यासाठी दिरंगाई केलेली आहे.

भारतीय वन सेवेतून गोव्यात येणारे अधिकारी, स्थानिक माणसे व गोव्यातील अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने त्याचप्रमाणे संयुक्त वन व्यवस्थापन सारख्या कार्यक्रमांची अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जात नसल्याने आज अशा प्राण्यांसाठी नाममात्र अधिवास ठरलेले आहे.

जेथे अशा संरक्षित क्षेत्रात या प्राण्यांची ससेहोलपट चालू आहे, तेथे अन्य ठिकाणी त्यांची कशी परिस्थिती असेल? याची केवळ कल्पनाच केली तर वास्तवाची जाणीव होते.

आज जागतिक वन्यजीव दिन साजरा होत असताना लोकसहभागातून वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी वन खात्यातर्फे नियोजनबद्ध आराखडा तयार केला जात नाही. त्यामुळे गोव्यातील जंगल निवासी आदिवासी आणि रानटी जनावरे यांच्यातला संघर्ष विकोपाला गेलेला ठिकठिकाणी दृष्टीस पडत आहे. या प्रश्नासंदर्भात जर गांभीर्याने दखल घेतली नाही तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com