''यंदा मडगाव पालिकेवर भाजपचाच झेंडा''

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

फातोर्ड्यातील वेगवेगळे समाज घटक भाजपमध्ये प्रवेश करत असून यामुळे भाजपची ताकद वाढली आहे.

मडगाव: फातोर्ड्यातील वेगवेगळे समाज घटक भाजपमध्ये प्रवेश करत असून यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. याचा सकारात्मक परिणाम या खेपेस पालिका निवडणुकीत दिसणार असून पंधरा वर्षांनंतर मडगाव पालिकेवर पुन्हा भाजपच्या पॅनलचा झेंडा फडकणार आहे, असा विश्वास भाजपचे प्रवक्ते उर्फान मुल्ला यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच म़डगाव पालिका जिंकण्याची मोहीम या खेपेस यशस्वी होणार आहे. मडगाव, फातोर्डामधील 22 प्रभाग  व कुडतरी मतदारसंघातील तीन्ही प्रभागात भाजपची स्थिती भक्कम झाली आहे, असे मुल्ला यांनी सांगितले. 

गोवा: काँग्रेसमधील खदखद उफाळली! जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

मुस्लीम समाजातही भाजपची सर्वसमावेशकता व विकासाभिमुख ध्येयधोरणांची जाणीव झाली असून मुस्लीम समाजातील युवक मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश करत आहेत. फातोर्डा मतदारसंघातील मुस्लीम समजाचे 45 तरुण गेल्या दोन दिवसांत भाजपात सामील झाले. एसटी समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. वेगवेगळे समाजातील तरुण भाजपमध्ये येत असल्याने भाजपची ताकद निश्चितच वाढली आहे. याचा दृश्य परिणाम पालिका निवडणुकीत दिसणार आहे, असे मुल्ला यांनी सांगितले. 

चंद्रवाडा, बोर्डा, हाऊसिंग बोर्ड, फकीरबांद, शिरवडे, मोती डोंगर येथील मुस्लीम बहुल लोकवस्तीत भाजपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजप सर्व समाजातील लोकांना बरोबर घेऊन पुढे जात आहे. नोकऱ्यांध्ये सर्व समाजातील तरुणांना संधी मिळळणार असल्याचा विश्वास तरुणांमध्ये निर्माण झाला आहे, असे मुल्ला यांनी सांगितले.

संबंधित बातम्या