यंदा अधिक शेती लागवडीखाली आणणार

cultivation
cultivation

डिचोली

मागील वर्षीच्या खरीप हंगामाच्या तुलनेत डिचोली विभागीय कृषी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात यंदा जवळपास ६० हेक्‍टर अतिरिक्‍त शेती लागवडीखाली आणण्याचे उद्दिष्ट कृषी खात्यातर्फे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे यंदा डिचोलीत ३०० हून अधिक हेक्‍टर जमीन शेती लागवडीखाली येण्याची आशा वाढली आहे. मये आणि शिरगाव भागातही यंदा अतिरिक्‍त शेती लागवड येणार आहे. शेतकऱ्यांना भात बियाणेही वितरीत करण्यात आले आहे, अशी माहिती डिचोली विभागीय कृषी कार्यालयातून मिळाली आहे. दरम्यान, मागील तीन-चार दिवसांपासून पडणाऱ्या दमदार पावसामुळे बळीराजाही सुखावला असून डिचोलीतील विविध भागात आता शेतीकामांना वेग आला आहे. डिचोली विभागीय कृषी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या आणि कृषी उत्पादनात आघाडीवर असलेल्या साळ गावासह मेणकुरे, धुमासे, अडवलपाल, मये, पिळगाव, शिरगाव, बोर्डे, म्हावळिंगे, कुडचिरे आदी भागात सध्या शेतीकामे जोरात सुरू झाली आहेत. सध्या सर्वत्र शेतजमीन नांगरणीची कामे सुरू असतानाच, दुसऱ्याबाजूने शेतकऱ्यांनी तरवा लागवड आणि पेरणीची तयारी सुरू केली आहे. पावसाची कृपादृष्टी अशीच राहिल्यास चालू महिन्याच्या अखेरपर्यंत लावणी आणि पेरणीची कामे सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

पारंपरिक पध्दतीने नांगरणी
कामगारांची कमतरता म्हणा किंवा बदलत्या काळानुसर म्हणा कृषी व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यापासून आता आधुनिक अवजारे वा यंत्रांचा वापर करून शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा अधिक कल असल्याचे दिसून येत आहे. तालुक्‍यातील बहुतेक भागात आता ट्रॅक्‍टर वा पॉवर ट्रिलरच्या सहाय्याने शेती नांगरणीची कामे करण्यात येत असली, तरी साळ, मेणकुरे, धुमासे, कुडचिरे, पिळगाव, मये आदी काही ठराविक भागात आजही काही शेतकरी ‘जोत’ बांधून पारंपरिक पध्दतीने नांगरणी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. या भागातील अवघ्याच शेतकऱ्यांनी ही परंपरा टिकवून ठेवली आहे.

आतापर्यंत पडणारा पाऊस समाधानकारक आहे. सर्वत्र शेतीकामात बळीराजा व्यग्र आहे. डिचोली विभागीय कृषी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या भागातील शेतकऱ्यांना कृषी खात्यातर्फे आतापर्यंत तीन टन भात बियाणे वितरीत करण्यात आले आहे. अतिरिक्‍त लागवडीखाली येणाऱ्या ६० हेक्‍टर शेतजमिनीत गोवा धन-१ आणि गोवा धन-३ या जातीच्या भाताची लागवड करण्यात येणार आहे.
- विश्वनाथ गावस, कृषी अधिकारी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com