
पणजी : योग ही भारताने जगाला दिलेली बहुमोल देणगी आहे. म्हणूनच जगभरातील बहुतांश देशांनी योगदिनाला आणि योगाला मान्यता दिली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अन्न व प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी केले.
आठवा जागतिक योगदिन जगभरासह राज्यातही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘मानवतेसाठी योग’ या ब्रीदवाक्याने साजरा झालेला योगदिन आंतरराष्ट्रीय वारसा स्थळांसह अनेक ठिकाणी विविध उपक्रमांनी पार पडला. या सोहळ्यात केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, मंत्री, आमदार यांच्यासह हजारो नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
जागतिक योगदिनानिमित्त आग्वाद किल्ला आणि गोवा मुक्ती संग्रहालयात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय अन्न व प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती मंत्री प्रल्हादसिंग पटेल म्हणाले, योग हा जाती-धर्माच्या पलीकडे मानवाला पूर्णत: संरक्षण देणारी चिकित्सा आणि उपचार पद्धती आहे. जर ती नित्यनेमाने अंगिकारली तर मानवाला रोगमुक्त आयुष्य जगता येते.
कोरोना काळात योगाचे महत्त्व जगाला कळाले, असेही पटेल यावेळी म्हणाले. यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, पर्यटन सचिव रवी धवन, जीटीडीसीचे अध्यक्ष गणेश गावकर, संचालक निखिल देसाई आणि मान्यवर उपस्थित होते.
ताळगावात मुख्य शासकीय कार्यक्रम
योगदिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम ताळगाव पठारावरील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर पार पडला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मुख्य सचिव परिमल रॉय यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला आरोग्य संचालनालय, क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी योगासने सादर केला.
सी कॅथेड्रलमध्ये योग
जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेल्या जुने गोवे येथील सी कॅथेड्रल चर्चमध्ये आज योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम झाला. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला इंडिया टुरिझमचे प्रादेशिक संचालक डी. व्यंकटेशन उपस्थित होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.