विविध विद्या, शास्त्रांचे घरोघरी अध्ययन करा

प्रतिनिधी
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

प्रा. रामचंद्र नाईक : तपोभूमीवर योग, वास्तू, ज्योतिष, संस्कृत ऑनलाईन वर्गांचे उद्‍घाटन

खांडोळा: योग, संस्कृत, वास्तू,ज्योतिष अशा शास्त्र विद्या घरोघरी पोहोचाव्या,  विद्वानांचा वारसा प्रत्येक कुटुंबात सुरू व्हावा, समाज सुज्ञ व्हावा हीच सद्‍गुरूची इच्छा आहे. सद्यःस्थितीत कोरोना महामारीच्या काळात शाळा कॉलेज, आस्थापने बंद आहेत, त्यामुळे अशा स्थितीत विद्यार्थ्यांची व समाजाची अव्यवस्था होऊ नये, उत्तमरीत्या ज्ञानप्राप्त करता यावे, विद्यार्थ्यांना विविध विद्या शास्त्र याचे ज्ञान घरोघरी राहून आत्मसात करता यावे या उद्देशाने हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे विविध विद्या, शास्त्रांचे घरोघरी अध्ययन करुया. असे आवाहनपर अध्यक्षीय भाषण संचालक प्रा. रामचंद्र नाईक यांनी केले.

श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर धर्मभूषण सद्‍गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींच्या मार्गदर्शनानुसार स्वामी ब्रह्मानंद संस्कृत प्रबोधिनीतर्फे ऑनलाईन वर्गांचे उद्‌घाटन संचालक रामचंद्र नाईक यांच्या हस्ते श्री क्षेत्र तपोभूमीवर करण्यात आले.

वेदमूर्ती ज्ञानेश्वर उपाध्याय यांनी स्वागत केले, शिक्षकांचा परिचय केला. सद्‍गुरू नामावली, प्रार्थना शांतीपाठाने वर्गाची सुरुवात झाली. वेदमूर्ती सतीश उपाध्याय यांनी फाउंडेशन कोर्स इन वास्तू अँड ज्योतिष हा वर्ग शिकविला व वेदमूर्ती महादेव उपाध्याय यांनी संस्कृत संभाषण वर्ग शिकविला. 

या वर्गाच्या उद्‍घाटन सत्रात श्री दत्त पद्मनाभ पीठाचे  संचालक रामचंद्र नाईक, डॉ. स्वप्निल नागवेकर, सुवर्णलता वायंगणकर, वेद संस्कृत प्रबंधक वेदमूर्ती ज्ञानेश्वर उपाध्याय, ज्योतिष वर्गाचे आचार्य वेदमूर्ती सतीश उपाध्याय, संस्कृत वर्गाचे आचार्य वेदमूर्ती महादेव उपाध्याय इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या ऑनलाइन वर्गांसाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे. याकरिता वर्गप्रवेश सुरू आहे. सर्वांना सुसंधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ९१३००६६३६२ व ७७७५९९९३९९ या क्रमांकावर संपर्क करून या अभ्यासक्रमसंदर्भात सविस्तर माहिती घ्यावी व प्रवेश स्वीकारावा, असे आवाहन स्वामी ब्रह्मानंद संस्कृत प्रबोधिनीच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या