आपण वापरलेले वीज बिल भरावेच लागले: निलेश काब्राल

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

निलेश काब्राल म्हणाले, ही सूट मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत होता. कारण गोवा सरकार वीज निर्मिती करत नाही तर केंद्र सरकारकडून वीज विकत घेते. कोणता तरी पक्ष वीज बिल माफ करा, म्हणून फिरतो म्हणून तसे करता येणार नाही.

पणजी: वापरलेल्या विजेचे बिल भरावेच लागणार आहे. केवळ न वापरलेल्या विजेचे जे बिल आकारण्यात आले होते, त्यात सूट दिली जाणार आहे, अशी माहिती वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.

 

ते म्हणाले, ही सूट मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत होता. कारण गोवा सरकार वीज निर्मिती करत नाही तर केंद्र सरकारकडून वीज विकत घेते. कोणता तरी पक्ष वीज बिल माफ करा, म्हणून फिरतो म्हणून तसे करता येणार नाही. औद्योगिक आणि वाणिज्यिक वीज ग्राहकांनी अमुक युनिट विजेचा वापर करू अशी हमी दिलेली असते. त्याला डिमांड चार्जेस म्हणतात. त्यानुसार त्यांना बिले आकारण्यात आली. एखाद्याने १ हजार युनिटची हमी दिलेली असताना प्रत्यक्षात दोनशे युनिट वीज वापरली. त्यांना आता न वापरलेल्या वीज युनिटचे शुल्क परत केले जाणार आहे. घरगुती वीज ग्राहकांनी टाळेबंदीच्या काळात घरीच थांबून वीज वापरली आहे त्यांना बिल भरावेच लागणार आहे. त्यात सूट नाही. त्यांना केवळ स्थिर आकारावर ५० टक्के सवलत दिली आहे.

 

ते म्हणाले, आपले वीज बिल भरमसाठ येते असे वाटत असल्यास वीज खाते तेथे समांतर दुसरा मीटर बसवून वीज वापराचे मापन करण्यास तयार आहे. त्यासाठी वीज खाते वा माझ्याशी जनतेने संपर्क साधावा. कोणत्या तरी पक्षाकडे संपर्क साधून वीज ग्राहकांचे प्रश्न सुटणार नाहीत. युनिटावर पाच पैसेही दर वाढवलेला नाही. तीन महिन्यांचे बिल एकदाच दिल्याने लोकांना ते जास्त वाटले आहे. आता महिन्याचे बिल देणे सुरू केले आहे. सध्या ६५० मेगावॉट विजेची गरज दररोज भासते. चार ते पाच टक्के मागणी दरवर्षी वाढत आहे अशी माहिती देऊन ते म्हणाले, महाराष्ट्रातून येणारा वीज पुरवठा सुरळीत असतो. कर्नाटकातून येणारी वीज सुरळीत करण्यासाठी नवीन वीज वाहिनी घालण्यात येणार आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या