''पर्रिकरांच्या भ्र्ष्ट व स्वार्थी राजकारणाचा वारसा आप पुढे नेणार''

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 12 एप्रिल 2021

पर्रिकर यांच्या भ्रष्ट राजवटीचे प्रतिक आहे अशी टिका गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष बिना शांताराम नाईक यांनी केली आहे. 

मडगाव : गोव्याचे माजी मुख्यमंत्री व माजी संरक्षण मंत्री स्व. मनोहर पर्रिकर यांची कारकीर्द ही भ्रष्टाचारी कारभार, यु-टर्न व स्वार्थी राजकारणाने भरलेली होती. पर्रिकर यांच्या या कारकिर्दीचा वारसा पुढे नेण्याची आम आदमी पक्षाचे (आप) नेते व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांची  घोषणा म्हणजे आप ही भाजपची "बी टीम" असल्याचा पुरावाच आहे. पणजीच्या अटल सेतुला गेलेले तडे हे पर्रिकर यांच्या भ्रष्ट राजवटीचे प्रतिक आहे अशी टिका गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष बिना शांताराम नाईक यांनी केली आहे. सिसोदिया यांनी पर्रिकरांचा वारसा पुढे नेण्यासाठी `आप`ला सत्ता द्या असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर नाईक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.  . 

आज माझे दिवंगत पती स्व. शांताराम नाईक यांची ७५ वी जयंती असून माझ्या पतीनी राजकारणात विचारसरणी, तत्वे व नीतीशास्त्रा बद्दल कधीच तडजोड केली नाही. कॉंग्रेस पक्षाशी ते अखेरच्या श्वासापर्यंत निष्ठावंत राहीले. सिसोदिया व आपने पर्रिकरांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचारी कारभाराचा एकदा आढावा घ्यावा. गोवा लोकायुक्तांनी ज्या २१ भ्रष्टाचार व बेकायदेशीरपणाच्या प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत त्यातील बहुतेक प्रकरणे पर्रीकर यांच्या कार्यकाळातील आहेत असे नाईक यांनी म्हटले आहे. अटल सेतुला वाहतुकीस खुला केल्यानंतर अवघ्या काही महिन्यात तडे गेले व रस्त्याला खड्डे पडले. पुलाच्या दोन रॅम्पचे काम अजून होणे बाकी आहे याकडे नाईक यांनी लक्ष वेधले  आहे. ( You will carry on the legacy of Parrikars corrupt and selfish politics)

भाजपकडूनच पर्रीकरांची विकासदृष्टी धुळीस!''

सायबर एज घोटाळा, बिच क्लिनींग घोटाळा, पणजी पार्किंग फी कंत्राट घोटाळा, स्मार्ट सिटी घोटाळा, मिरामार-दोनापावल रस्ता घोटाळा, इफ्फी घोटाळा, पाटो येथिल स्पेसीस इमारत भाडे घोटाळा, एसईझेड प्रवर्तकांना व्याज देण्याचा घोटाळा, कचरा व्यवस्थापन घोटाळा असे अनेक घोटाळे पर्रिकर यांच्या कारकिर्दीत झाले हे आम आदमी पक्षाने लक्षात ठेवावे, असे नाईक यांनी सांगितले.  

 संरक्षण मंत्री म्हणुन काम करताना " राफेल घोटाळा" करुन पर्रीकर यांनी आपला भ्रष्टाचारी कारभार चालुच ठेवली होता हे आता उघड झाले आहे. पर्रिकर यांचे सहकारी असलेल्यानीच त्यांना " फटींगाचा बाप" व "दलाल" अशी उपाधी दिली होती याची आठवण नाईक यांनी आम आदमी पक्षाला करुन दिली आहे. 

संबंधित बातम्या