हिंदुस्‍थानी संगीताचे ‘तारा’कडून धडे : मात्र, आपली युवा पिढी विदेशींच्‍या मागे

सांस्कृतिक प्रतिनिधी
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

आज भारतीय तरुण पिढी पाश्चात्य संस्कृतीकडे आकर्षित होत असल्याची हाकाटी ऐकू येते

पणजी: आज भारतीय तरुण पिढी पाश्चात्य संस्कृतीकडे आकर्षित होत असल्याची हाकाटी ऐकू येते. परंतु, या पिढीने धडा घ्यावा, आदर्श घ्यावा, असे अभिमानास्पद कार्य पाश्चात्य लोक भारतीय कला, संस्कृती याचा सखोल अभ्यास करून, प्रचार व प्रसार करून करत आहेत. भारतीय समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे विलक्षण अप्रूप परदेशातील युवक, युवतींनाही वाटते. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक अंगांबद्दल जाणून घेण्यात, त्यावर अभ्यास, संशोधन करण्यात ते मनापासून रस घेतात याची अनेक उदाहरणे आज समोर आहेत. म्हणूनच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, नृत्य पाश्चात्य देशात रुजले,
फळले आहे. एवढेच नव्हे, तर पाश्चात्य कलाकारांनी हिंदुस्तानी संगीताची साधना करून त्यावर प्रभुत्व मिळवण्यापर्यंत मजल मारली आहे.

या पार्श्वभूमीवर पोर्तुगाल येथील शांटेल गोम्स (आता तिने ‘तारा'' हे भारतीय नाव धारण केले आहे) या युवतीने पणजी येथे संजीवन संगीत अकादमीला भेट देऊन तिथे चाललेल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व नृत्य शिक्षणाविषयी आस्थेने जाणून घेतले. तिने स्वतः ओडिसी या भारतीय शास्त्रीय नृत्याचा अभ्यास केला आहे. कष्टपूर्वक शिक्षण घेतले आहे. विशेष म्हणजे तिने हरमल - पेडणे येथे स्वतःचे भारतीय पद्धतीचे गुरुकुल स्थापन केले आहे. त्यात भारतीय व परदेशी विद्यार्थ्यांना ती भारतीय नृत्य, संगीताचे शिक्षण देते. ती परदेशी असून ॲकॅडमी हा शब्द न वापरता गुरुकुल म्हणते. यावरून ती भारतीय कला- संस्कृती किती कोळून प्यायली आहे, याचा प्रत्यय येतो. तिला भारतीय कला आणि संस्कृतीबद्दल प्रचंड आस्था आहे.

संबंधित बातम्या