अज्ञानाचे खापर माझ्यावर फोडु नये: पत्रकार परिषदेत आमदार दयानंद सोपटे यांचा पलटवार

दैनिक गोमंतक
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

आपल्या अज्ञानाचे खापर विनाकारण माझ्यावर फोडु नये असे  आमदार दयानंद सोपटे यांनी आज त्यांच्या मांद्रे येथील आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना  सांगितले.

पेडणे: मांद्रे येथे मगो पक्षाला सभा घेऊ देण्यात आली नाही  या संदर्भात माझा कुठल्याही  प्रकारे आजीबात संबंध नाही.सभेसाठी  कायदेशीर सोपस्कार पूर्ण न केल्याने मामलेदार व पोलीसांनी कारवाई केली असेल तर जीत आरोलकर यांनी आपल्या अज्ञानाचे खापर विनाकारण माझ्यावर फोडु नये असे  आमदार दयानंद सोपटे यांनी आज त्यांच्या मांद्रे येथील आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना  सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत मांद्रे भाजप मंडळ उपाध्यक्ष गोविंद आजगावकर व सदस्य मिलिंद तळकर हे उपस्थित होते. 

पुढे बोलतानाआमदार श्री.सोपटे म्हणाले कि,जिल्हा ग्रामपंचायतीची एक ,विधानसभा निवडणूकीसाठी पेडणे मतदारसंघातुन एकदा व मांद्रे मतदारसंघातुन दोनदा मिळून चार वेळा मी  निवडून आलो.मी शिवाजी महाराजांचे चारीत्र्य अनेक वेळा वाचलेले आहे.त्यांच्या विचारसरणीला स्मरून मी वागत आलो आहे. राजकारणात किंवा अन्यत्र कुणा बद्दलही वाईट इच्छित नाही. आतापर्यंत मी जशा छोट्या सभा घेतल्या तसेच अनेकदा पाच सहा हजार जनसमूहाच्या सभा घेतल्या त्या सगळ्या कायदेशीररित्या घेतल्या. ग्रामपंचायत ते मामलेदार,पोलीस ह्या सगळ्यांच्या परवाना व  सर्व सोपस्कार पूर्ण करून घेतल्या.त्यासाठी कुणी सरकारी अधिकारी येऊन ती साधी बैठक असो किंवा मोठी सभा असो ती बंद करता येइल अशी कधीही चूक केली नाही.

मांद्रे येथे जी मगोची होणारी सभा कायदा व सुव्यवस्थेसाठी वगैरेसाठी मामलेदार व  पोलीस येऊन होऊ दिली नसावी. प्रत्येकाला आपला शिष्टाचार समजून  घेण्याची गरज आहे. ते शिष्टाचार जर कुणाला माहीत नाहीत तर ती त्याची चूक. प्रशासकीय कायद्यानुसार उपजिल्हाधिकाऱ्यानी मामलेदार व पोलिस निरीक्षकाला कारवाई करण्याचा आदेश दिला आणि त्यांनी त्या आदेशाचे पालन केले तर त्याचे खापर फोडून जीत आरोलकर यांनी आपल्या अकलेचे तारे तोडलेले आहेत. इतके लोक बघून त्याना वाटले कि मी आता भ्यालो. भिण्याचा प्रश्‍नच नाही. मी भितो तो देव, माझे कार्यकर्ते व मतदार याना. जीत आरोलकर यांच्यासोबत जे देवेंद्र प्रभुदेसाई व राघोबा गावडे यांनी ही गर्दी बघून दयानंद सोपटे यांना  हृदयविकाराचा झटका येईल अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, हे दोघे कुणी डॉक्टर नाहीत.या दोघांना मी सांगू इच्छितो की, माझ्या आरोग्याची तुम्ही काळजी करण्याची अजिबात गरज नाही. तुमच्याच आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. तुमच्या बोलण्यातून तुमची लायकी कळते.

विधानसभा निवडणुकीत सहाशे मते ओलांडता न येणाऱ्या देवेंद्र प्रभुदेसाई यांनी मला शहाणपणा शिकविण्याची आवश्यकता नाही.या अशा दोन्ही व्यक्तीसारख्या लोकापासून जीत आरोलकर यांनी सावध रहावे.याच वेळी मगोचे नेते तसेच ज्येष्ठ राजकारणी सुदिन ढवळीकर हेही उपस्थित होते.त्याना सगळे माहीत असल्याने ते एक शब्द बोलले नाहीत.त्यांचाकडून जीत आरोलकरानी शिकण्यासारखे बरेच काही आहे. दुसरे म्हणजे त्या कार्यक्रमाला जे साडेतीनशे चारशे लोक उपस्थित होते त्यातील काही सरपंच  व इतर काही मोजके लोक वगळता इतर सर्व हे बिनओळखीचे चेहरे होते. पाच सहा हजार कार्यकर्त्यांच्या सभा घेतलेल्या  इतक्या लोकांना पाहून भिण्याची गरज नाही. गेल्या पोट निवडणुकीत माझ्याविरुध्द मंत्रिमंडळातील चार मंत्री वावरत होते. माझा पराभव करण्यासाठी भरपूर पैसा पुरविला.पण माझ्या बाजूने मतदार होते माझे कार्यकर्ते होते. त्यांच्या पाठिंब्यावरच मी प्रचंड मतानी विजयी झालो असे शेवटी आमदार सोपटे म्हणाले.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या