पेडण्यातील युवकाचा सव्वा तासातच मृत्यू!

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

पेडण्यातील २९ वर्षीय युवकाचा उपचारासाठी गोमेकॉत दाखल झाल्यानंतर सव्वा तासाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोरोनामुळे हा बळी गेला आहे. मागील चोवीस तासांत या युवकासह म्हापसा येथील ८४ वर्षीय वृद्धाचाही कोरोनाने बळी घेतला आहे.

पणजी :  पेडण्यातील २९ वर्षीय युवकाचा उपचारासाठी गोमेकॉत दाखल झाल्यानंतर सव्वा तासाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोरोनामुळे हा बळी गेला आहे. मागील चोवीस तासांत या युवकासह म्हापसा येथील ८४ वर्षीय वृद्धाचाही कोरोनाने बळी घेतला आहे. 

राज्यात कोरोनामुळे बळी जाण्याचे प्रमाण कमी झाले असले, तरी आरोग्याची काळजी आणि नियमांचे पालन करणे महत्त्वाचे बनले आहे. पेडण्यातील २९ वर्षीय युवकाचा ज्याप्रमाणे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सव्वा तासात मृत्यू झाला त्यावरून कोरोनामुळे सुरक्षितता महत्त्वाची असल्याचे स्पष्ट झाले आहे. गणेशोत्सवानंतर दिवाळीसणाची एकाबाजूला लगबग सुरू आहे, पण कोरोनाकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा फटका कुटुंबाला बसत असल्याने जनतेने खऱ्या अर्थाने आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. 

दोन बळींमुळे राज्यातील कोरोनाच्या आत्तापर्यंतच्या बळींची संख्या ६५८ झाली आहे. त्याशिवाय १५५१ जणांच्या चाचण्या झाल्या असून १५६ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. ७४ जणांना घरगुती विलगीकरणात राहण्यास अनुमती मिळाली आहे. त्याशिवाय १६७ जणांची प्रकृती सुधारल्याने मागील चोवीस तासांत त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात एकूण ॲक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ हजार ७१५ एवढी असून मडगाव (१३८), फोंडा (१४७) आणि पणजी (११०) या ठिकाणच्या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत शंभरपेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आत्तापर्यंत ४५ हजार ७६१ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले असून ४३ हजार ३८८ जणांची प्रकृती सुधारली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.८१ टक्के एवढे आहे.

संबंधित बातम्या