हरवळेतील धबधब्यावर जुने गोवेतील युवक बुडाला

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार भालचंद्र पाटील हा आपल्या अन्य तीन मित्रांसमवेत पावसाळी पर्यटनासाठी हरवळे धबधब्यावर आला होता. मित्रांसमवेत धबधब्याच्या पायथ्याशी आंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने भालचंद्र पाण्यात गटांगळ्या खाऊ  लागला.

डिचोली: पावसाळी पर्यटनासाठी मित्रांसमवेत आलेल्या २४ वर्षीय युवकाचा हरवळे धबधब्यावर बुडून दुर्दैवीरित्या अंत होण्याची घटना घडली. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. बुडालेल्‍या युवकाचे नाव भालचंद्र वसंत पाटील असे असून, तो पीडीए कॉलनी-जुने गोवे येथील होता. 

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार भालचंद्र पाटील हा आपल्या अन्य तीन मित्रांसमवेत पावसाळी पर्यटनासाठी हरवळे धबधब्यावर आला होता. मित्रांसमवेत धबधब्याच्या पायथ्याशी आंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने भालचंद्र पाण्यात गटांगळ्या खाऊ  लागला. मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड केली. तोपर्यंत भालचंद्र पाण्यात नाहीसा झाला. घटनेची माहिती मिळताच डिचोली अग्निशमन दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली लिडींग फायर फायटर रत्नकांत गावस यांच्या नेतृत्वाखाली बाबूराव गावस (चालक ऑपरेटर), उमेश गावकर, रुपेश पळ, विशाल वायंगणकर, आदित्य गावस, हर्षद गावस, आशिष मोर्लेकर या दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. 

दोन तासांच्‍या शोधमोहिमेनंतर मृतदेह सापडला
दलाच्या जवानांनी यांत्रिकी बोटीच्या मदतीने सुमारे दोन तास पाण्यात शोध घेतल्यानंतर मृतदेह हाती लागला. डिचोली पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रजीत मांद्रेकर यांनी घटनेचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह बांबोळी येथे पाठवला आहे. दरम्यान, हरवळे धबधब्याच्या पायथ्याखालील परिसर आंघोळीसाठी असुरक्षित असतानाही, त्याठिकाणी आंघोळ करण्याचे प्रकार चालूच असतात. यातून काहीजणांना प्राणही गमवावे लागले आहेत. याठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्याव्यात. अशी मागणी होत आहे. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या