नोकरीच्या शोधात गेलेल्या ‘त्या’ दोन्ही युवकांचे कलेवरच आले घरी..!

Dainik Gomantak
बुधवार, 27 मे 2020

हंगामी स्वरुपातील रोजगार उपलब्ध असल्याची माहिती मिळाल्याने दोघांनीही सकाळी मडकईची वाट धरली होती.

फोंडा

कोरोना’मुळे टाळेबंदी... त्यातच रोजगाराचे वांदे... त्यामुळे रोजीरोटी तर चालायला पाहिजे, कुटुंबाला हातभार लागायला पाहिजे, त्यासाठी जुने गोवेतील ‘ते’ दोघेही युवक सकाळी मडकईतील औद्योगिक वसाहतीतील एका औषध निर्मिती आस्थापनात नोकरीसाठी सकाळीच घराबाहेर पडले. पण, नोकरी कुठली... या दोघांचे कलेवरच घरी परतले. जुने गोवे येथील आकाश महादेव होसमणी व रितेश चंद्रकांत कुडीनूर या दोन्ही विशीतील तरुणांचा ट्रक आणि दुचाकीच्या जबरदस्त टकरीत जागीच मृत्यू झाला आणि या दोन्ही युवकांच्या कुटुंबियांना मोठा धक्काच बसला.
आकाश आणि रितेश या दोघांबरोबर आणखीही युवक या आस्थापनात नोकरीसाठी मुलाखत द्यायला गेले होते. कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर अनेक कुटुंबांचे रोजगार हिरावले आहेत. खिशात पैसा नाही, त्यातच रोजगाराच्या संधी नाही, त्यामुळे बहुतांश युवक नोकरीच्या शोधात आहेत. मयत आकाश आणि रितेश या दोघांनाही मडकईतील औद्योगिक वसाहतीतील एका आस्थापनात कायमस्वरुपी नसल्या तरी हंगामी स्वरुपातील रोजगार उपलब्ध असल्याची माहिती मिळाल्याने दोघांनीही सकाळी मडकईची वाट धरली होती. मुलाखत दिली खरी, पण घरी परतताना या दोघांवरही काळाची झडप बसली, आणि होत्याचे नव्हते झाले. अपघात झाल्यानंतर ट्रक आणि दुचाकीने पेट घेतला. जोरदार टकरीमुळे दोन्ही युवक रस्त्याच्या कडेला फेकले गेले. डोक्‍याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. हादरवून सोडणाऱ्या या अपघाताचे ते दृष्य होते. होसमणी आणि कुडीनूर या दोन्ही कुटुंबियांना दोघेही रोजगाराची चांगली बातमी घेऊन येतील, अशी अपेक्षा होती, पण झाले भलतेच..!
उपलब्ध माहितीनुसार, या रस्त्यावर कायम अपघातांचे सत्र सुरू असते. हा रस्ता हॉटमिक्‍स डांबरीकरण करण्यात आला आहे. त्यातच प्रशस्त रस्त्यामुळे वाहने भरधाव वेगाने धावतात. औद्योगिक वसाहतीत येणारी वाहने तर भरधाव वेगाने येतात. त्यातच रस्त्यावर असलेल्या एका वळणाचा अंदाज या वाहनचालकांना येत नाही. दोन वर्षांपूर्वी एका दुचाकीस्वाराचा याच ठिकाणी अपघात होऊन मृत्यू झाला होता. दीड वर्षांपूर्वी एका दुचाकीस्वाराला कुठल्या तरी जनावराची ठोकर बसल्याने त्याचेही निधन झाले होते. आता दोन्ही विशीतील युवक ठार झाल्याने लोकांत हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

दुर्दैवी रितेशचा आज विसावा वाढदिवस..!
अपघातात ठार झालेल्या रितेश कुडिनूर याचा आज (बुधवारी ता. २७) रोजी विसावा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच दुर्दैवी रितेशवर काळाचा घाला पडला. वाढदिवसासाठी रितेशने ‘प्लॅनिंग’ ही केले होते, अशी माहिती देण्यात आली. अपघातातील दुसरा दुर्दैवी युवक आकाश होसमणी याचा येत्या २१ सप्टेंबरला एकोणीसावा वाढदिवस होता. ऐन उमेदीच्या काळातच या दोघांना रस्ता अपघातात मरण आल्याने आशाआकांक्षांवर पाणीच फेरले गेल्याची प्रतिक्रिया या दोन्ही युवकांच्या मित्रांकडून व्यक्त केल्या जात होत्या.

संबंधित बातम्या