सांताक्रुझ टोळीयुद्धप्रकरणातील  जेनेटोला अटकपूर्व जामीन नाकारला 

विलास महाडिक
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

संशयित जेनेटो कार्दोज हा जुने गोवे पोलिस तसेच पणजी पोलिसांना दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये चौकशीसाठी हवा आहे, मात्र अजूनही फरारी आहे.

पणजी

सांताक्रुझ टोळीयुद्ध प्रकरणातील मुख्य सूत्रधार तसेच फरारी असलेल्या संशयित जेनेटो कार्दोज याने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज आज सत्र न्यायालयाने फेटाळला त्यामुळे त्याची अडचण झाली आहे. गेल्या एक महिन्याहून अधिक काळ या अर्जावर न्यायालयात वारंवार सुनावणी व आदेश तहकूब झाला होता. 
संशयित जेनेटो कार्दोज याची पार्श्‍वभूमी गुन्हेगारीची असून अनेक प्रकरणांमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत. सांताक्रुझ टोळीयुद्धमागील सूत्रधार तो असल्याचा दाट संशय पोलिसांना असल्याने त्यासंदर्भातचे पुरावेही अटकेतील संशयितांच्या जबानीमधून जमा केले आहेत. त्यानुसार हा हल्ला पूर्ववैमनस्यातून त्याच्या इशाऱ्यानुसारच झाला असल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे त्याला 
अटकपूर्व जामीन मिळण्यामध्ये अडथळे निर्माण झाले होते. या घटनेची गंभीरता तसेच संशयिताची पार्श्‍वभूमी लक्षात घेत न्यायालयाने 
त्याचा अर्ज फेटाळला. 
संशयित जेनेटो कार्दोज हा जुने गोवे पोलिस तसेच पणजी पोलिसांना दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये चौकशीसाठी हवा आहे, मात्र अजूनही फरारी आहे. सांताक्रुझ येथील घटनेनंतर पणजीतील एका तरुणाचे इतर साथीदारांच्या मदतीने अपहरण करून जमिनीच्या मालमत्तेवरून त्याने धमकावले होते. त्याच्या कारवाया राज्यात सुरूच असताना पोलिस मात्र त्याला गजाआड करू शकलेले नाहीत. सांताक्रुझ टोळीयुद्ध प्रकरणात सुमारे २० संशयितांना अटक झाली असून त्यातील काहींना जामीन मिळाला आहे तर तीन बाल गुन्हेगार मेरशी येथील अपना घरमध्ये आहेत. या टोळीयुद्धामुळे मेरशी व चिंबल या भागात गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 
दरम्यान, पणजी पोलिसांनी तरुणाच्या अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे त्यामध्येही संशयित जेनेटो कार्दोज याचा समावेश आहे. या प्रकरणातील इतर तिघेही संशयित जामिनावर आहेत तर त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला नाही. त्यामुळे अपहरण प्रकरणातही तो पोलिसांना हवा आहे. 
 

 

संबंधित बातम्या