जेनेटोच्या अटकपूर्व जामिनावरील  निर्णय ३१ जुलैपर्यंत तहकूब 

विलास महाडिक
बुधवार, 29 जुलै 2020

पणजी पोलिसांनी तरुणाच्या अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे त्यामध्येही संशयित जेनेटो कार्दोज याचा समावेश आहे.

पणजी

सांताक्रुझ टोळीयुद्ध प्रकरणातील मुख्य सूत्रधार तसेच फरारी असलेल्या संशयित जेनेटो कार्दोज याच्या अटकपूर्व जामिनावरील निर्णय सत्र न्यायालयाने आज ठेवला होता मात्र तो आता येत्या ३१ जुलैपर्यंत तहकूब करण्यात आला आहे. तो जुने गोवे पोलिस तसेच पणजी पोलिसांना दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये चौकशीसाठी हवा आहे, मात्र अजूनही फरारी आहे. 
अर्जदार (संशयित) जेनेटो कार्दोज हा सांताक्रुझ टोळीयुद्धातील संशयित मुख्य सूत्रधार आहे. हा हल्ला त्याच्या इशाऱ्यानुसार करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी इतर संशयितांना अटक करून नोंद केलेल्या जबानीद्वारे न्यायालयासमोर सुनावणीवेळी केला होता. या गंभीर प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी संशयिताची पोलिस कोठडी आवश्यक आहे, अशी बाजू पोलिसांनी मांडलेली आहे. सांताक्रुझ टोळीयुद्ध प्रकरणात सुमारे २० संशयितांना अटक झाली असून ते सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत, तर तीन बाल गुन्हेगार मेरशी येथील अपना घरमध्ये आहेत. या टोळीयुद्धामुळे मेरशी व चिंबल या भागात गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 
दरम्यान, पणजी पोलिसांनी तरुणाच्या अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे त्यामध्येही संशयित जेनेटो कार्दोज याचा समावेश आहे. या प्रकरणातील इतर तिघेही संशयित जामिनावर आहेत तर त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला नाही. त्यामुळे अपहरण प्रकरणातही तो पोलिसांना हवा आहे. 
 

 

संबंधित बातम्या