‘चीन बंदी’ धोरणाची झुआरी पुलालाही झळ

Dainik Gomantak
शुक्रवार, 3 जुलै 2020

सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांच्या म्हणण्यानुसार या पुलासाठी लागणारे सुटे भाग हे इतर देशातून मिळवण्याचे प्रयत्न कंत्राटदार कंपनी ‘दिलीप बिल्डकॉन’ ही करणार आहे. सल्लागार कंपनीही बदलावी लागणार असून त्याबाबत केंद्र सरकारशी सल्लामसलत करून राज्य सरकार योग्य तो निर्णय घेणार आहे. या पुलाचे ३५ टक्के काम बाकी आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी चीनमधून काही तंत्रज्ञ येणार होते. मात्र, आता दोन्ही देशातील तणाव वाढल्याने त्यांचे येणे लांबणीवर पडले आहे. आता तर कंपनी बदलावी लागणार असल्याने ते येणारही नाहीत.

पणजी :

केंद्र सरकारने चीनमधून वस्तू आयातीवर बंदी घातल्याचा फटका झुआरी नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाला बसणार आहे. चीनमधील शांघाय तोंग्गॅन्ग ब्रिज टेक्नॉलॉजी ही झुआरी पुलासाठी सल्लागार कंपनी असून या पुलाच्यावर उभारण्यात येणाऱ्या दोन्ही मनोऱ्यांसाठी काही सुटे भागही चीनमधून आणले जाणार होते. त्या साऱ्यावर केंद्र सरकारने बंदी घातल्याने या प्रकल्पातून आता केंद्र व राज्य सरकारला या चिनी कंपनीला वगळावे लागणार आहे.
सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांच्या म्हणण्यानुसार या पुलासाठी लागणारे सुटे भाग हे इतर देशातून मिळवण्याचे प्रयत्न कंत्राटदार कंपनी ‘दिलीप बिल्डकॉन’ ही करणार आहे. सल्लागार कंपनीही बदलावी लागणार असून त्याबाबत केंद्र सरकारशी सल्लामसलत करून राज्य सरकार योग्य तो निर्णय घेणार आहे. या पुलाचे ३५ टक्के काम बाकी आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी चीनमधून काही तंत्रज्ञ येणार होते. मात्र, आता दोन्ही देशातील तणाव वाढल्याने त्यांचे येणे लांबणीवर पडले आहे. आता तर कंपनी बदलावी लागणार असल्याने ते येणारही नाहीत.

चौदाशे कोटींचा पूल...
राष्ट्रीय महामार्ग ६६ वर चौदाशे कोटी रुपये खर्चून केंद्र सरकार हा पूल बांधत आहे. या पुलासाठी चिनी सल्लागार कंपनी उपलब्ध होऊ शकत नसल्याने ‘आत्मनिर्भर’ भारतात देशी कंपनीचा शोध सरकारने सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. देशी कंपनी उपलब्ध झाली नसल्यास मित्र देशांकडे विचारणा केंद्र सरकारच्या पातळीवर केली जाणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.
दिलीप बिल्डकॉनचे उपाध्यक्ष (स्ट्रक्टरल) अतुल जोशी यांच्या म्हणण्यानुसार टेहाळणी मनोऱ्याचे साहित्य चीनमधून येणार होते. केबल स्टेडसाठीचे साहित्य चीनमधून आणले गेले आहे. सप्टेंबरमध्‍ये हे काम सुरू करण्याचे नियोजन आहे. आराखड्यानुसार इतर ठिकाणांहून साहित्य आणण्याचे प्रयत्न आहेत.

...तर काम रेंगाळू शकते!
झुआरी नदीवरील या पुलाचे काम ६५ टक्के पूर्ण झाले आहे. या पुलाच्या मध्यभागी दोन मनोरो उभारून त्यावर निरीक्षणालय व फिरते उपहारगृह उभारण्यात येणार आहे. त्यासाठी चीनमधील तंत्रज्ञानाचा प्रामुख्याने वापर करण्यात येणार होता. उर्वरित ३५ टक्के कामांत याच कामाचा प्रामुख्याने समावेश आहे. हा पूल डिसेंबर २०२० मध्ये पूर्ण व्हायचा होता. मात्र, कोविड टाळेबंदीमुळे काम एप्रिल २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. इतर देशात या पुलाचे बांधकाम केलेल्या तंत्रज्ञानानुरुप सुटे भाग लवकर न मिळाल्यास या पुलाचे काम मागे पडू शकते.

संबंधित बातम्या