दक्षिण गोव्यातील बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

दैनिक गोमन्तक
रविवार, 13 डिसेंबर 2020

जिल्हा पंचायत निवडणूक सासष्टीसह दक्षिण गोव्यातील काही नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या ठरल्या असून या निवडणुकीत या नेत्यांच्या राजकीय ताकदही आजमावली जाणार आहे. ​

मडगाव: जिल्हा पंचायत निवडणूक सासष्टीसह दक्षिण गोव्यातील काही नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या ठरल्या असून या निवडणुकीत या नेत्यांच्या राजकीय ताकदही आजमावली जाणार आहे. 

उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव, कुंकळ्ळीचे भाजपचे आमदार क्लाफास डायस, नुवेचे भाजपचे आमदार विल्फ्रेड (बाबाशान) डिसा,  सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी आपापल्या समर्थक उमेदवारांमागे आपली ताकद उभी केली असून या उमेदवारांचे यशापयश या नेत्यांच्या राजकीय ताकदीचे निदर्शक ठरणार आहे. 

आणखी वाचा:

काणकोण तालुक्यातील जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत २८ पैकी  ५ कोरोनाग्रस्तांकडून मतदान -

या सर्व बड्या नेत्यांनी आपल्याच उमेदवारांचा विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. कवळेकर यांचा खोला, बार्से, गिरदोली व शेल्डे या चार मतदारसंघांत प्रभाव असून या चारही मतदारसंघातील उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. खोला मतदारसंघाचा समावेश विधानसभेच्या केपे व काणकोण मतदारसंघात, तर बार्शेचा समावेश विधानसभेच्या केपे व सांगे मतदारसंघात होतो. गिरदोलीचा समावेश कुंकळ्ळी व केपे मतदारसंघात होतो. शेल्डे मतदारसंघातील अवेडे कोठंबी पंचायतीत कवळेकर यांचा प्रभाव आहे. शेल्डेच्या इतर पंचायतींमध्ये वीजमंत्री नीलेश काब्राल यांचा प्रभाव आहे. गिरदोलीत कवळेकर यांना क्लाफास डायस यांची, तर खोला मतदारसंघात इजिदोर फर्नांडिस यांची साथ आहे. बार्सेत मात्र सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांचे कवळेकर यांना आव्हान असेल. बार्सेत कवळेकर यांचे खंदे समर्थक खुशाली वेळीप हे भाजपचे उमेदवार आहेत, तर प्रसाद गावकर यांनी आपले बंधू संदेश गावकर यांच्या मागे आपली ताकद उभी केली आहे. या मतदारसंघात खुशाली वेळीप व संदेश गावकर यांच्या आड कवळेकर व प्रसाद गावकर यांच्यातच लढत असल्याची चर्चा आहे. 

सत्तरीत जिल्हा पंचायतीसाठी मतदानाची मतदानाची टक्केवारी घसरली -

कवळेकर यांनी मात्र चारही ठिकाणी भाजप उमेदवारांचाच विजय होणार असल्याचा व त्यामुळे दक्षिण गोव्यात भाजपची ताकद वाढणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. 
क्लाफस डायस यांनीही गिरदोलीत भाजपच्या उमेदवार संजना वेळीप यांचा विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. ‘गिरदोलीत मला कवळेकर यांची साथ लाभल्याने या खेपेस पहिल्यांदाच भाजप उमेदवार निवडून येण्याची संधी निर्माण झाली आहे. रेल दुपदरीकरण व कोळसा प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केल्याने या निवडणुकीत हा मुद्दा विशेष ठरणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

कवळेकर, डायस यांच्यासह काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले नुवेचे आमदार विल्फ्रेड डिसा यांच्यासाठीही जिल्हा पंचायतीच्या नुवे मतदारसंघातील लढत महत्वाची आहे. डिसा यांनी  माजी सरपंच ब्रिझी बारेटा यांना या निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे केले आहे. ‘नुवेत मतदान कमी झाले असले तरी ब्रिझी बार्रेटो याच निवडून येणार आहेत’  असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

कोरोनामुळे गोवा जिल्हा पंचायत निवडणूकीच्या मतदानाचा टक्का घटला ; मतमोजणी उद्या -

 
चर्चिल आलेमाव यांनी सासष्टीत तीन व सेंट लॉरेन्स मतदारसंघात एक असे मिळून राष्ट्रवादी काँग्रेसचे चार उमेदवार उभे केले आहेत. यापैकी बाणावलीतील मिनीन फर्नांडिस यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. फर्नांडिस यांच्या निवडणुकीतील यशापयशावर बाणावलीतील पुढील राजकीय गणिते अवलंबून असतील. काँग्रेसच्या रॉयला फर्नांडिस यांनी मिनीन फर्नांडिस म्हणजेच पर्यायाने चर्चिल आलेमाव यांच्या समोर आव्हान उभे केले आहे. रॉयला फर्नांडिस यांच्याकडे काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीच्या बाणावलीच्या उेमेदवार म्हणूनही पाहात आहेत. त्यामुळे बाणावलीतील लढत आलेमाव यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. 
बाणावलीतील जनता नेहमी आपल्या पाठिशी राहिली असून या खेपेसही त्यांच्याकडून आपल्यास पाठिंबा मिळेल. तसेच इतर तीन मतदारसंघातील उणेदवारही निवडून येतील, असा विश्वास आलेमाव यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या