Goa: झुआरी उड्डाणपुलाचे लवकरच उद्‍घाटन

झुआरी पुलाची एक बाजू खुली करण्यासंदर्भात केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबतच्या बैठकीत ठरवण्यात आले
Goa: झुआरी उड्डाणपुलाचे लवकरच उद्‍घाटन
Zuari bridge will open shortlyDainik Gomantak

पणजी: दिल्ली दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत(Pramod Sawant) यांच्याकडून राज्यातील राजकीय घडामोडींची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी जाणून घेतली. विधानसभा निवडणुकीसंदर्भात(Goa Assembly Election) मुख्यमंत्र्यांशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(Amit Shah) यांनी चर्चा केली असून दिल्लीत विकासकामे, प्रलंबित प्रश्नांसोबत राज्यातील राजकारणाबाबत बारकाईने चर्चा करण्यावर या दोन्ही नेत्यांनी भर दिला असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदे घेत ही संपूर्ण माहिती दिली असून पुढे ते म्हणाले, धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यासाठी केंद्रीय आदिवासी कल्याणमंत्री अर्जुन मुंडा यांची भेट घेतली. रजिस्ट्रार ऑफ इंडिया या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अख्यत्यारीतील यंत्रणेने हा निर्णय घ्यावा, यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. शेजारील राज्यांत धनगर समाज इतर मागासवर्गीयांत असल्याने गोव्यात आदिवासी दर्जा देण्यात अडचणी येत आहेत. पोर्तुगीज काळात या समाजाला ‘गवळी’ संबोधण्यात येत असे. पण नंतर त्यांची नोंद ‘धनगर’ अशी झाली. आता ‘गवळी’ असे संबोधून कागदपत्रे सादर केली आहेत.

तसेच पंतप्रधानांना पूर्ण प्रकल्पांच्या उद्‍घाटनासाठी वेळ देण्याची विनंती केली असून आग्वाद येथील पूर्वीच्या कारागृहाचे सुशोभीकरणानंतर तसेच गोमेकॉच्या सुपर स्पेशालिटी विभाग इमारतीचे उद्‌घाटन त्यांनी करावे, असे सुचवले आहे. त्यांनीही उद्‍घाटनासाठी वेळ देण्याचे मान्य केले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे . तसेच आत्मनिर्भर भारत योजनेच्या धर्तीवर स्वयंपूर्ण गोवा मोहीम सरकार राबवत असून त्यात सहभागी सरपंच, पंच, स्वयंपूर्ण मित्र यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधावा, अशी विनंती केली असून त्यांनी ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये संवाद साधण्याचे मान्य केले आहे. कोविड लसीकरणात राज्याने देशात अग्रेसर राहण्याचा मान मिळवल्याची माहिती पंतप्रधानांना दिली. राज्यातील ९० टक्के लोकांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतल्याचे त्यांना सांगण्यात आले.

राज्यातील ग्रामीण भागातील इंटरनेटची समस्या दूर करण्यासाठी भारत नेट योजना सरकारने किंवा खासगी भागीदारीतून राबवावी, अशा पर्यायांवर दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली. यातील एक पर्याय निवडून राज्य सरकार त्यांना कळवणार आहे.

त्यासोबतच झुआरी पुलाची एक बाजू १९ डिसेंबर रोजी खुली करण्यासंदर्भात केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबतच्या बैठकीत ठरवण्यात आले. मोप विमानतळाला जोडणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन करण्याचेही यावेळी ठरवले. वरुणापुरी ते वास्को महामार्ग टप्पा डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी इफ्फी आयोजनाबाबत चर्चा केली. शनिवारी त्यासंदर्भात पहिली बैठक घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचीही भेट घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

नदीपात्रात साचणाऱ्या रेतीच्या पट्ट्यांतून रेती काढण्यासाठी केंद्रीय मंत्रालयाने अधिसूचना जारी करण्याची गरज आहे. केंद्रीय वन, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी त्याबाबत चर्चा केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. जैव संवेदनशील म्हणून अधिसूचित करावयाच्या २६ गावांपैकी काही गावे त्या यादीतून वगळता येतील का पाहावे, अशी विनंती त्यांना केल्याचे ते म्हणाले. २०० कोटी रुपये खर्चाच्या एकात्मिक किनारी व्यवस्थापनाला मान्यता देण्याविषयी चर्चा केली, असेही सावंत म्हणाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com