झुआरीनगरमधील कंटेन्मेंट झोन हटवला

बुधवार, 2 सप्टेंबर 2020

कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी दक्षिण गोवा प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी झुआरीनगर परीसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला होता, तो आज (मंगळवारी) हटविण्यात आला.

मुरगाव: कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी दक्षिण गोवा प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी झुआरीनगर परीसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला होता, तो आज (मंगळवारी) हटविण्यात आला. तथापि, त्या परीसरात दोन लघू कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत. दरम्यान मुरगाव तालुक्यात मंगळवारी ४६ नवीन रुग्णांची भर पडली. तालुक्यात एकूण ४५६ सक्रिय रुग्ण आहेत.

मांगोरहिल झोपडपट्टीत १ जून रोजी कोरोनाचा उद्रेक दिसून आल्यावर प्रशासनाने तो परीसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करून तेथील रहिवाशांना बंदिस्त केले होते. ७० दिवसांनंतर हा झोन हटविण्यात आला होता. तर आता झुआरीनगर कंटेन्मेंट झोन हटविण्यात आला आहे. झुआरीनगर झोपडपट्टीतही कोरोना रुग्णांची संख्या बेसुमार वाढली होती.त्याचा प्रसार इतरत्र होऊ नये म्हणून कंटेन्मेंट झोन घोषित करून लोकांना बंदिस्त केले होते. गेले ६३ दिवस लोक घरातच बंदिस्त होते. त्यांना मुक्त केल्याने लोकांनी समाधान व्यक्त केले.

दरम्यान, झुआरीनगरातील कंटेन्मेंट झोनमधील रहिवाशांना सोयीसुविधा मिळत नसल्याच्या रहिवाशांच्या वाढत्या तक्रारी होत्या. त्यामुळे दोन-तीन वेळा लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली होती. तथापि, सद्यःस्थितीत झुआरीनगरात कोरोना रुग्ण शून्यावर आल्याने प्रशासनाने कंटेन्मेंट झोन हटवून त्या बदल्यात दोन मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार केले आहे. दरम्यान मुरगाव तालुक्यात मंगळवारी ४६ नवीन रुग्णांची भर पडल्याने प्रशासनात खळबळ माजली. सोमवारी सक्रिय रुग्णांची संख्या ४१० होती ती मंगळवारी एकदम ४५६ झाली. त्यामुळे मुरगाव तालुक्यात अजूनही कोरोनाचा प्रसार चालूच आहे हे स्पष्ट झाले.

मुरगाव तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली होती त्यामुळे प्रशासन पातळीवर समाधान व्यक्त केले जात होते. पण, मंगळवारी एकदम रुग्ण संख्या वाढल्याने प्रशासनाची धावपळ झाली. मंगळवारपर्यंत तालुक्यात एकूण ४५६  सक्रिय रुग्ण होते. पैकी वास्को शहर आरोग्य केंद्रात २५३, कुठ्ठाळी केंद्रात ८५ आणि कांसावली केंद्रात ११८  सक्रिय रुग्ण होते. वास्को केंद्रात २७ नवीन रुग्ण सापडले तर कुठ्ठाळी आरोग्य केंद्रात १४ नवीन रुग्णांची नोंद झाली.कांसावलीत ५ नवीन रुग्ण नोंद झाले.

दरम्यान, मुरगाव तालुक्यातील सर्व कंटेन्मेंट झोन हटविले आहे. कोरोनाबाधीत बरेच रुग्ण आजारावर मात करून घरी परतले आहेत. मात्र नवीन रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

संबंधित बातम्या