राज्‍यात भू गटार प्रकल्‍प राबवण्‍याचे ध्‍येय

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

मंत्री माविन गुदिन्हो : दाबोळी जॉगर्स पार्क परिसरात भू-गटार कामाचा शुभारंभ

दाबोळी जॉगर्स पार्क परिसरात भू-गटार व वाहिनीच्या कामाच्या शुभारंभावेळी पंचायतमंत्री गुदिन्हो बोलत होते.

 

दाबोळी: राज्यातील कचरा समस्या सोडविताना संपूर्ण गोव्यात भू-गटार प्रकल्प राबवण्याचे ध्येय सरकारने बाळगलेले आहे. भूगटारमधील सांडपाण्याचे प्रकल्पातून शुद्धीकरण केल्यानंतर त्या पाण्याचा उपयोग औद्योगिक क्षेत्रात, उद्यानात व इतर गरजेच्या ठिकाणी करता येईल, असे प्रतिपादन पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी केले.
यावेळी त्यांच्यासमवेत चिखलीचे उपसरपंच कमलाप्रसाद यादव, पंच रॉबर्ट फालकाव, मारी मास्कारेन्हास, लिगोर मोन्तेर, ब्रह्मा पवार, रेमंड कार्व्हालो, दिगंबर आमोणकर, दाबोळी भाजप गटाध्यक्ष संदीप सूड, महिला मोर्चा अध्यक्ष अनिता थोरात, दिशांत परब व इतर उपस्थित होते.

गुदिन्हो म्हणाले की, संपूर्ण गोव्यात भू-गटार प्रकल्प उभारण्याचा फायदा नागरिकांबरोबर मोठमोठ्या औद्योगिक क्षेत्राला होईल.यासाठी सरकार भू-गटार प्रकल्पाविषयी गंभीर असून लवकरच यावर योग्य तो निर्णय घेणार, असे गुदिन्हो म्हणाले.तसेच चिखली औद्योगिक वसाहतीत मिनी कचरा प्रकल्प उभारण्याचा विचार असल्याने लवकरच संपूर्ण चिखली पंचायत क्षेत्रातील कचरा समस्येवर तोडगा निघेल.दाबोळी भागात कचरा उघड्यावर टाकल्यास याचा परिणाम येथील विमानतळावरील विमानांना होऊ शकतो. यासाठी स्थानिकांनी कचरा चिखली पंचायतीच्या सफाई कामगारांना द्यावा, असे गुदिन्हो यांनी सांगितले.

या भागात अंदाजे पाचशे मिटर भू-गटार कामाला सुरवात झाली असून अंदाजे तीस लाख रुपये खर्च येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम भू-गटार विभागाचे कार्यकारिणी अभियंता आदिती सरदेसाई यांनी सांगितले.

 

 

 

मडगावात प्रवासी बसला आग

संबंधित बातम्या