शॅकमध्ये गोव्यातील अन्न मिळत नाही दुर्दैव : राणे

Dainik Gomantak
शनिवार, 11 जानेवारी 2020

विद्यार्थ्यांना केवळ कौशल्य प्रमाणपत्र देऊन उपयोग नाही, तर त्यांना त्यांच्याकडील कौशल्याच्या माध्यमातून रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी निर्माण झाल्या पाहिजेत.

विलास ओहाळ
पणजी

किनारी भागातील शॅकवर गोव्याचे अन्न बनविणारे स्वयंपाकी मिळत नाहीत, हे वास्तव आहे. गोव्यातील शॅकवर बाहेरच्या राज्यातून आलेले स्वयंपाकी काम करतात. त्यामुळे पर्यटकांना गोव्यातील अन्नपदार्थ मिळत नाहीत, तर त्यांना उत्तर भारतीय अन्नपदार्थ खावे लागतात. त्यासाठी यात बदल होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे आपल्याला कोणत्या क्षेत्रात संधी आहे, याचा शोध घेणे आवश्‍यक आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सतत स्वतःमध्ये सुधारणा करीत राहिले पाहिजे, असे मत कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री विश्वजित राणे यांनी व्यक्त केले.
कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालयाच्यावतीने कला अकादमीमध्ये आयोजित केलेल्या ‘कौशल्य जागृती’ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर या खात्याचे सचिव सी. आर. गर्ग, प्रवीण खुल्लर, दामोदर कोचकर, कौस्तुभ नाथ आणि संचालक दीपक देसाई यांची उपस्थिती होती.
मंत्री राणे म्हणाले की, कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने वाटचाल करीत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आणि आपल्या सहकार्यामुळे हे खाते विविध उपक्रम हाती घेत आहे. केवळ औद्यागिक क्षेत्र, मंत्रालय किंवा केंद्र सरकारच्या दृष्टीकोनाकडे आम्ही पाहत नाही, तर लोकांना काय हवे आहे याचा विचार करतोय. कारण विद्यार्थ्यांना केवळ कौशल्य प्रमाणपत्र देऊन उपयोग नाही, तर त्यांना त्यांच्याकडील कौशल्याच्या माध्यमातून रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी निर्माण झाल्या पाहिजेत. इतरांच्या दृष्टीने गोव्यात वेगळ्या कशा संधी उपलब्ध होतील, याकडे आम्ही लक्ष पुरविले आहे. पंतप्रधानांनी ठेवलेल्या ध्येयानुसार आम्ही पावले टाकत असून, केंद्राकडून पैसा उपलब्ध होत असून, त्याचा विनियोग योग्यपद्धतीने झाला पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, एप्रिल महिन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शक उपलब्ध होतील, असा कार्यक्रम आयोजित केला जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या गुणवत्तेत सुधार करता येईल. पुढील वर्षी २०२१ मध्ये जागतिक स्तरावरील कौशल्य विकास कार्यक्रमासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. मागील दहा वर्षांपूर्वी आपण आरोग्य मंत्री असताना आणि सध्याची आरोग्य खात्याची स्थिती पाहिल्यास अनेक बदल आपल्याला झालेला दिसून येत आहे. पंतप्रधान कार्यालयाला आम्ही गोवा हे राज्य प्रत्येक रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न करीत आहे, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे राज्याचे हे मॉडेल देशभरात लागू करण्याचा त्यांचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयटीआयच्या प्रमाणपत्राकडे कमीपणाने पाहू नये, आपल्या कौशल्याला त्यांनी सतत बदलत ठेवले, तर अनेक क्षेत्रात तुम्ही आपला ठसा उमटवू शकता, असेही त्यांनी पटवून दिले.
दीपक देसाई म्हणाले की, आयटीआयमध्ये जुन्या प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज आता उरली नाही. नव्या आव्हानानुसार नव्या अभ्यासक्रमांचा समावेश झाला पाहिजे, तरच विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होणार आहे. पणजी, म्हापसा, पेडणे येथे लवकरच आयटीआयची नवी इमारत उभारली जाणार आहे. याप्रसंगी खुल्लर, गर्ग, कौस्तुभ नाथ यांनीही मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) प्राचार्यांना भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याशिवाय शांघाय येथे झालेल्या जागतिक कौशल्य विकास कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आशिष वळवईकर यांनी त्या कार्यक्रमाविषयी माहिती सादर केली. याप्रसंगी खात्याच्या संकेतस्थळाचे मंत्री राणे यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले.

संबंधित बातम्या