गोमंतकीय खलाशांचा प्रश्न सुटला

Dainik Gomantak
बुधवार, 22 एप्रिल 2020

. जगभरातील खलाशी व दर्यावर्दींना भारतात आणण्यासाठी केंद्रीय जहाजोद्योग मंत्रालयाने सुचवलेल्या प्रक्रीयेला आरोग्य मंत्रालयानंतर आज केंद्रीय गृह मंत्रालयाने मान्यता दिली.

पणजी

गेले काही दिवस राज्य सरकारला कोंडीत पकडणारा जगभरातील जहाजांवर अडकलेल्या गोमंतकीय दर्यावर्दी, खलाशांचा प्रश्न अखेर आज सुटला. मुंबई बंदरातून डिस्कवरी हे जहाज उद्या युरोपला निघणार म्हणून त्यावरील खलाशांना तत्पूर्वी मुंबईत उतरवून घ्या यासाठी राज्य सरकारवर समाजमनाचा वाढता दबाव होता. जगभरातील खलाशी व दर्यावर्दींना भारतात आणण्यासाठी केंद्रीय जहाजोद्योग मंत्रालयाने सुचवलेल्या प्रक्रीयेला आरोग्य मंत्रालयानंतर आज केंद्रीय गृह मंत्रालयाने मान्यता दिली.
जहाज मालकाने असे अडकलेले खलाशी शोधले पाहिजेत, गेल्या २८ दिवसांच्या त्यांच्या प्रवासाची माहिती उपलब्ध केली पाहिजे. खलाशाची पूर्ण आरोग्य तपासणी कोविड १९ संदर्भात केली जाणार आहे. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने उतरण्याच्या बंदरापासून त्याच्या घरापर्यंत वाहतूक परवाना जारी केला पाहिजे.वाहन चालकासाठी वेगळा परवाना जारी केला जाणार आहे. बंदरावर उतरवून घेतल्यावर पून्हा आरोग्य चाचणी होईल. त्यात त्यांनी जाण्यास हरकत नाही असा वैद्यकीय अभिप्राय देण्यात आला तरच खलाशांना आपल्या घरापर्यंत प्रवास करता येणार आहे. जहाजाच्या प्रमुखाने बंदरात प्रवेश करताना आरोग्यविषयक माहिती बंदर प्रशासनाला सादर करणे आवश्यक करण्यात आले आहे. तपासणीचा अहवाल येईपर्यंत खलाशांना बंदरातच विलगीकरण कक्षात रहावे लागणार आहे. चाचणीत खलाशाला कोविड १९ ची लागण झाल्याचे समजल्यास त्याला उपचारासाठी दाखल व्हावे लागणार आहे. लागण झाली नसल्यास वाहतूक परवान्याच्या आधारे त्याला घरी जाता येणार आहे.

गोमंतकीय खलाशांना परत येण्याची संधी मिळाली आहे. केंद्र सरकारचे मी आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यात लक्ष घातल्याने हा प्रश्न सुटला आहे. मुंबई बंदरात आता गोमंतकीय खलाशी उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

संबंधित बातम्या