श्रीलंकेत अडकले गोमंतकीय

Dainik Gomantak
शनिवार, 2 मे 2020

ते कोलंबोच्या बंदरात जहाजावरून उतरले आणि विमानाने गोव्यात येणार होते. मात्र त्याचवेळी भारतात टाळेबंदी जाहीर झाली आणि आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणे बंद झाली. तेव्हापासून हे खलाशी श्रीलंकेत अडकले आहेत. त्यात २७ गोमंतकीय आहेत.

पणजी

राज्य सरकारने मुंबई बंदरात जहाजावर अडकलेल्या दर्यावर्दींची दखल घेत त्यांचा राज्यात येण्याचा मार्ग सुकर केला असला तरी अद्याप शेजारील श्रीलंकेतही गोमंतकीय दर्यावर्दी अडकल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना भारतात आणण्यासाठी विमान पाठवण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा अशी त्या दर्यावर्दी, खलाशांच्या कुटुबियांची मागणी आहे. गेले २५ दिवस ते सरकारची पत्रव्यवहार करत आहेत.

जहाजावरून कोलंबो बंदरात कामावरून उतरून गोव्यात येण्याचा बेत काहींचा होता. त्यानुसार ते कोलंबोच्या बंदरात जहाजावरून उतरले आणि विमानाने गोव्यात येणार होते. मात्र त्याचवेळी भारतात टाळेबंदी जाहीर झाली आणि आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणे बंद झाली. तेव्हापासून हे खलाशी श्रीलंकेत अडकले आहेत. त्यात २७ गोमंतकीय आहेत. ते सध्या कोलंबो येथील दुतावासाच्या संपर्कात आहेत. मात्र त्यांचा दैनंदिन खर्च त्यांनाच करावा लागत आहे. हॉटेलमध्ये राहणे आणि जेवणाच्या खर्चामुळे त्यांचे अर्थकारण बिघडून गेले आहे.

या खलाशांपैकी काहींनी राज्य सरकार, अनिवासी गोमंतकीयांसाठींचे आयुक्तालय, पंतप्रधान कार्यालय सगळीकडे दाद मागितली आहे. सरकारमधील उच्च पदस्थांना व्हॉटेसअप संदेश पाठवले परंतु पाहतो करतो यापलीकडे गाडी सरकत नसल्याने सगळे हवालदील झाले आहे. बंदरालगत असलेल्या जहाजांनंतर खोल समुद्रातील जहाजांवरील खलाशांना आणण्यात येणार आहे. यामुळे कामावरून उतरून शेजारील देशात अडकलेल्या खलाशांना कधी आणले जाणार असा प्रश्न या खलाशांच्या कुटुंबियांना पडला आहे. श्रीलंकेत सध्या दोनशे भारतीय विविध कारणांनी अडकून पडले आहेत. तेथील दुतावास केवळ  विचारपूस करते आणि माहिती प्रदान करते. पूर्वी ते सारे विविध ठिकाणी राहत होते. आता दुतावासाच्या पुढाकाराने त्यांना एका हॉटेलात ठेवण्यात आले आहे. मात्र दैनंदिन खर्च त्यांच्या त्यानाच करत आहे. कामावरुन  उतरल्याने जहाज कंपनीही तो खर्च देत नाही. टाळेबंदीत वाढ झाल्याने आता तरी राज्य सरकारने या खलाशांना आणण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणावा. काही खलाशांच्या कुटुंबियांनी आंदोलने केली म्हणून त्या खलाशाना आणण्यात आले मात्र अनेक खलाशांची कुटुंबे अद्याप सरकार उपाययोजना करेल यावर विश्वास ठेऊन आहेत. राज्य सरकारने देशात इतर ठिकाणी अडकलेल्यांना आणण्यासाठी पावले टाकणे सुरु केले आहे. त्यात धर्तीवर शेजारील श्रीलंकेत अडकलेल्या गोमंतकीयांना आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी या खलाशांच्या कुटुंबियांची मागणी आहे.

 

संबंधित बातम्या