गोव्याच्या किनाऱ्यावरील रात्रीची कासवांची जत्रा

Dainik Gomantak
गुरुवार, 16 एप्रिल 2020

या कासवांची मादी विणीच्या हंगामात समुद्रकिनाऱ्यावर येते. तिथे सुरक्षित जागी वाळूत खड्डा खणून १०० ते १५० अंडी घालते. यथावकाश त्यातून पिल्ले बाहेर पडतात. समुद्राकडे जायचे याचे ज्ञान त्यांना उपजतच असते. साधारण ५० ते ५५ त्यातून पिल्ले बाहेर पडतात.

अवित बगळे,
सध्या कोविड १९ ची टाळेबंदी सुरु असताना गोव्यातील समु्द्रकिनाऱ्यावरून ९५ टक्के कासवांची पिल्ले सुखरुपपणे समुद्रात परतली ही निश्चितपणे दखल घेण्याजोगी बाब आहे. दरवर्षी कासवे येऊन मांद्रे, मोरजी, आगोंद आणि गालजीबागच्या किनाऱ्यावर अंडी घालतात पण सर्वच अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात असे नाही. बरीचशी अंडी नासतात, काही अंड्यातील पिल्ले मरतात. सर्वसाधारपणे ७० टक्के पिल्ले समुद्रात परत जातात. यंदा ते प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत आहे म्हणूनच ती दखल घेण्याजोगी बाब आहे. गोव्याच्या पर्यटनाला वेगळा चेहरा देण्याची हीच खरी योग्य वेळ आहे.
भारताच्या एकूण ८ हजार किमी लांबीच्या किनाऱ्यावर सागरी कासवांच्या ४ प्रजाती आढळतात. त्यांपैकी ओलिव्ह रिडले (Olive Ridley) या जातीची सागरी कासवे गोव्याच्या किनाऱ्यावर घरटी बनवताना आढळून आली आहेत. या कासवांची मादी विणीच्या हंगामात समुद्रकिनाऱ्यावर येते. तिथे सुरक्षित जागी वाळूत खड्डा खणून १०० ते १५० अंडी घालते. यथावकाश त्यातून पिल्ले बाहेर पडतात. समुद्राकडे जायचे याचे ज्ञान त्यांना उपजतच असते. साधारण ५० ते ५५ त्यातून पिल्ले बाहेर पडतात. समुद्राकडे जायचे ज्ञान त्यांना जन्मताच लाभलेले असते. समुद्राच्या लाटांचा आवाज आणि त्याची कंपने यांवरून कोणत्या दिशेला समुद्र आहे हे त्यांना समजत असावे. अंड्यातून बाहेर पडल्या नंतर समुद्राकडे धाव घेणारी त्यांची पावलं वाळूवर पावलांची नक्षी काढत आपला निरोप घेत असतात. सकाळी ६ वाजता व संध्याकाळी ६ वाजता हा मोहक नजारा पाहावयास मिळतो. हा निसर्गाची अद्भभुत रचना प्रत्यक्ष पाहावयास अनेक पर्यटक गर्दी करू शकतात. कोकणात भाऊ काटदरेंच्या पुढाकाराने कासव महोत्सव रुजू शकतो तर गोव्यात का नाही याचा विचार केला गेला पाहिजे.
कासवांच्या नवजात पिल्लांना समुद्राच्या लाटांचा आवाज आणि त्याची कंपने यांवरून कोणत्या दिशेला समुद्र आहे हेही समजते. ओल्या वाळूवर सुंदर ठसे उमटवत ही पिल्ले समुद्रात जातात. त्यांतील मादी पिल्ले परिपक्व झाल्यावर परत त्याच किनाऱ्यावर अंडी घालायला येतात हे विशेष. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर वाळूवरून चालत समुद्रात जाणे ही कासवाच्या जीवनक्रमातली महत्त्वाची घटना असते. याच दरम्यान तो किनारा कासवाच्या नैसर्गिक GPS मध्ये नोंदला जातो. पिल्लांना किनाऱ्यावरून न चालवता थेट समुद्रात सोडले तर ती पिल्ले पुन्हा किनाऱ्याकडे कधी येउच शकत नाहीत. मात्र याच घटनेमध्ये त्यांच्या जिवाला सर्वाधिक धोका असतो. किनाऱ्यावरचे खेकडे, घारी, समुद्रपक्षी, कोल्हे, कुत्री, तरस इत्यादी प्राणी या पिल्लांवर नजर ठेऊन असतात. एकाच वेळी हजारोंच्या संख्येने बाहेर पडणारी पिल्ले म्हणजे या भक्षकांसाठी मेजवानीच. या शत्रूंपासून जीव वाचवून समुद्रात गेलेल्या पिल्लांपुढेही आव्हाने काही कमी नसतात. मोठे मासे आणि इतर सागरी भक्षकांचा धोका असतोच. त्यातून वाचलेली पिल्ले परिपक्व होतात. त्यांचे नैसर्गिक आयुष्यमान साधारण ८० ते १०० वर्षांचे असते. आजच्या काळात कोणत्याही प्राण्याचा सर्वात मोठा शत्रू हा माणूस आहे. माणसांची वाढती लोकसंख्या आणि प्रदूषण यांमुळे अनेक प्राण्यांचे अधिवास नष्ट होत आहेत. सागरी कासवही त्यास अपवाद नाही. अनकेदा ही कासवे मासेमारीसाठी लावलेल्या जाळ्यांमध्ये अडकून किंवा बोटीच्या धडकेने मृत्युमुखी पडतात. सागरी कासवाच्या जीवनचक्रात किनारा हा महत्त्वाचा घटक आहे. आजकाल किनाऱ्यावर चालणारे जलक्रीडा वगैरे उपक्रम, सतत चालू असणारी माणसांची वर्दळ, गोंगाट, रोषणाई इत्यादी गोष्टींमुळे कासवांना अंडी घालायला सुरक्षित किनारे मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या संख्येवर विपरीत परिणाम होतो आहे. सागरी परीसंस्थेच्या संतुलनासाठी ही चिंतेची बाब आहे.
गोव्यातील मांद्रे, मोरजी, आगोंद आणि गालजीबाग किनाऱ्यांवर ओलिव्ह रिडले जातीची कासवे घरटी बनवतात. कासवाच्या नैसर्गिक भक्षकांपासून, तसेच कासवाच्या पिल्लांचा बेकायदेशीर व्यापार करणाऱ्या लोकांकडून या पिल्लांना धोका असतो. मात्र स्थानिक स्वयंसेवक नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात किनाऱ्यावरची कासवांची घरटी शोधून त्यातली अंडी बाहेर काढून सुरक्षित जागी पुरून ठेवतात. पुरलेल्या जागेवर एक टोपली उलटी करून ठेवली जाते. अंड्यांची संख्या, तारीख, वेळ वगैरे तपशील नोंदले जातात. ती जागा कुंपणाने संरक्षित केली जाते. मग दोनेक महिन्यात अंडी फुटून पिल्ले बाहेर येऊ लागतात. या कालावधीत संस्थेचे स्वयंसेवक रोज सकाळी ७ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता टोपल्या वर करून घरटी तपासतात. अंड्यांतून बाहेर आलेल्या पिल्लांना किनाऱ्यावर सोडले जाते. मग ती इवलीशी पिल्ले आपल्या दुडूदुडू चालीने समुद्रात प्रवेश करतात. हा सारा सोहळा म्हणजेच ‘कासव महोत्सव’! पर्यटकांचा या कल्पनेला मोठा प्रतिसाद लाभू शकतो. पर्यटन दिनदर्शिकेत कासव महोत्सवाच्या तारखा समाविष्ट केल्या तर आमचा गोवा पाहण्यासाठी या असे सांगत कोट्यवधी रुपये खर्च करून जगभर हिंडण्याचीही गरज भासणार नाही.
गोव्याला १२० किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. या किनाऱ्यांलगतच्या गावांत कासवांविषयी जागृती करण्यात केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाच्या पुढाकाराने सुरु झालेल्या पर्यावरण अभ्यास केंद्राची आणि त्यातही संशोधक सुजितकुमार डोंगरे यांची भूमिका महत्वाची आहे. गोमंतकीय समाज हा निसर्गप्रेमी कसा आहे आणि तो या कासवांच्या विरोधात कसा नाही हे त्यांच्याच तोंडून ऐकायला हवे. मोरजीच्या शॅक्समध्ये कासवांनी अंडी घातल्यावर तीस सुरक्षितस्थळी हलवेपर्यंत शॅक मालकाची चाललेली घालमेल आदी किस्से थेट त्यांच्याकडून ऐकण्यातच मजा आहे. कांदोळी येथील किनाऱ्यावर कासवाने एकदा चुकून अंडी घातल्यावर एका भारतीय पर्यटकाने वन खात्याचा क्रमांक शोधून काढून त्यांना माहित कशी दिली यावरही ते भरभरून बोलतात. मोरजी येथे कासवे अंडी घालतात हे शोधून काढले स्थानिकांनी कॅप्टन जेराल्ड फर्नांडिस आणि गालजीबाग येतील फादर मारीयानो यांनी स्थानिकांच्या मदतीने कासवांची अंडी सुरक्षित ठेवण्यासाठी स्थानिकांना प्रोत्साहित केले. १९९६-९७ चा तो काळ होता. त्यानंतर वन खात्याने जबाबदारी आपल्याकडे घेताना स्थानिकांना मानधनावर स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली. कासवांचे संवर्धन झाले. शॅकची संख्या मर्यादीत झाली, सायंकाळानंतर संगीत व प्रखर प्रकाशझोत वापरण्यावर बंदी आली. वाहनांना किनारे बंद झाले. मात्र हीच कासवे आता पर्यटनाची वेगळी दारे गोव्यासाठी उघडणार आहेत, त्यासाठी या सगळ्याकडे वेगळ्या नजरेने बघण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या