‘अवे’ मैदानावर विजयाची प्रतीक्षा संपुष्टात

Dainik Gomantak
गुरुवार, 16 जानेवारी 2020

पुद्दूचेरीवरील विजयापूर्वी अवे मैदानावरील गोव्याने शेवटचा विजय २०१६-१७ मोसमात नोंदविला होता. तेव्हा २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१६ या कालावधीत धनबाद (झारखंड) येथील रेल्वे मैदानावर आंध्रला ३४ धावांनी हरविले होते. आंध्रविरुद्धच्या विजयानंतर सलग ९ सामने गोव्याचा संघ अवे मैदानावर विजयाविना राहिला.

किशोर पेटकर
पणजी

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत अवे (बाहेरगावी) मैदानावर विजय नोंदविण्यासाठी गोव्याला तब्बल चार वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. अखेर पुद्दूचेरीला ८१ धावांनी हरवून गोव्याच्या क्रिकेट संघाने अवे मैदानावर विजयाचे पूर्ण गुण प्राप्त करण्याची किमया साधली.
पुद्दूचेरीवरील विजयापूर्वी अवे मैदानावरील गोव्याने शेवटचा विजय २०१६-१७ मोसमात नोंदविला होता. तेव्हा २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१६ या कालावधीत धनबाद (झारखंड) येथील रेल्वे मैदानावर आंध्रला ३४ धावांनी हरविले होते. आंध्रविरुद्धच्या विजयानंतर सलग ९ सामने गोव्याचा संघ अवे मैदानावर विजयाविना राहिला.
२०१६-१७ मोसमातील शेवटच्या सामन्यात मुंबईतील बीकेसी मैदानावर हिमाचलने गोव्याला ७ विकेट्सनी हरविले. २०१७-१८ मोसमातील ३ अवे सामन्यांत अनिर्णित निकालांचा सामना करावा लागला. २०१८-१९ मोसमात गोव्याचा रणजी संघ अवे मैदानावर ५ सामने खेळला आणि सर्व सामन्यांत पराभवाची नामुष्की आली.
गोव्याने १९७ रणजी क्रिकेट सामन्यात २४ सामने जिंकले आहेत. त्यापैकी १५ विजय होम (घरच्या) मैदानावर आहेत, तर ९ विजय अवे मैदानावरील आहेत. रणजी स्पर्धेत गोव्याने अवे मैदानावर एकूण ५६ सामने गमावले आहेत.
यंदाच्या मोसमात गोव्याने चारपैकी तीन विजय होम मैदानावर पर्वरीत नोंदविले आहेत. बिहारविरुद्धच्या अवे मैदानावर पाटणा येथे गोव्याने अनिर्णित निकालावर समाधान मानावे लागले. रणजी करंडक इतिहासात एका मोसमात चार सामने जिंकण्याचा पराक्रम गोव्याने पुद्दूचेरीस नमवून प्रथमच साकारला आहे.

२०१२-१३ मोसमापासून ‘अवे’ मैदानावर गोवा
मोसम सामने विजय पराभव अनिर्णित
२०१२-१३ ४ ० ० ४
२०१३-१४ ४ १ १ २
२०१४-१५ ५ ० १ ४
२०१५-१६ ४ ० ० ४
२०१६-१७ ९ २ ३ ४
२०१७-१८ ३ ० ० ३
२०१८-१९ ५ ० ५ ०
२०१९-२० २ १ ० १
एकूण ३६ ४ १० २२

संबंधित बातम्या