गोव्यातील रस्ते होणार चकाचक

Dainik Gomantak
रविवार, 12 एप्रिल 2020

टाळेबंदीच्या काळात लोक घरात सध्या असले तरी १४ एप्रिलनंतर ते घराबाहेर पडतील तेव्हा त्यांना सुंदर स्वच्छ रस्ते अनुभवता येणार आहेत.

अवित बगळे
पणजी,

टाळेबंदीच्या काळात लोक घरात सध्या असले तरी १४ एप्रिलनंतर ते घराबाहेर पडतील तेव्हा त्यांना सुंदर स्वच्छ रस्ते अनुभवता येणार आहेत. राज्यातील सर्व प्रमुख रस्त्यांच्या बाजूला पडलेला कचरा गोऴा करण्याचे काम सध्या गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने हाती घेतले असून पहिल्या टप्प्यात जिल्हा प्रमुख रस्त्याच्या कडेचा कचरा हटवला जात आहे.
राष्ट्रीय महामार्गालगतचा कचरा संकलन करण्याचे कंत्राट महामंडळाने याआधीच दिले आहे. ते काम टाळेबंदीच्या काळातही सुरु आहे. पालिकांचे सफाई कामगारही कामावर आहेत. मात्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या टाळेबंदीच्या काळात रस्त्यावरील रहदारी अत्यंत कमी झाल्याची संधी घेत रस्त्याच्या बाजूची सफाई हाती घेण्याची सूचना केली होती. गेल्या एप्रिलपासून हे काम सुरु कऱण्यात आले आहे. दररोज दोन ते तीन टन कचरा या माध्यमातून गोळा केला जात आहे.
कोविड १९ च्या संकटाने लोकांची हालचालच मर्यादीत झाल्याने आणि पर्यटकांनी राज्याकडे पाठ फिरवल्याने कचरा संकलनात कमालीची घट झाली आहे. कचरा व्यवस्थापन खात्याचे संचालक लेविनसन मार्टिन्स यांनी सांगितले की साळगाव येथील कचरा प्रक्रीया प्रकल्पात दीडशे टन कचरा दररोज येत असे. त्यात आता घट होऊन आता जेमतेम ८० टन कचऱ्याचे संकलन होत आहे. त्या प्रकल्पाला ऊर्जा निर्मितीसाठी कचरा कमी पडू नये म्हणून ग्रामीण भागातील कचराही आता त्या प्रकल्पाकडे वळवण्यात येत आहे. लोकांची ये जा मंदावल्याने कचरा संकलनात किमान पन्नास टक्के घट झाल्याचे दिसते.
त्यांनी सांगितले की प्लास्टीकचा कचऱ्याचे तुकडे करण्याचे (बेलिंग) काम सध्या तीन ठिकाणी सुरु आहे. मात्र टाळेबंदीमुळे कर्नाटकातील सिमेंट कंपन्या बंद आहेत. त्या सिमेंट कंपन्यांत उच्च दाबाने तो कचरा जाळण्यासाठी पाठवला जात असे. आता तु्कडे केलेला प्लास्टीकचा कचरा साठवून ठेवण्यात येत आहे. महामार्गाशेजारी संकलीत होणारा प्लास्टीकचा कचरा या केंद्रांकडे न वळवता तो थेट साळगावच्या प्रकल्पात पाठवला जात आहे.कचरा संकलनात घट झाली असली तरी कचरा संकलनासाठी नवी केंद्रे उभारण्याचे काम या टाळेबंदीच्या काळात पूर्ण केले जाणार आहे. त्यासाठी जागा निश्चिती केली जात आहे.
जिल्हा प्रमुख रस्त्याचे पाच भाग करून मजुरांच्या एका टोळीकडे एक भाग सोपवला जातो. दिवसभरात तो रस्ता कचरामुक्त होईल असे पाहिेले जाते. सर्व कचरा संकलीत करून तो साळगाव येथे नेला जातो तेथे त्यावर प्रक्रीया करून ऊर्जा निर्मिती केली जाते. मडगावच्या सोनसडो परिसरात प्रक्रीया केल्यानंतर विलग करण्यात आलेला सुका कचरा तेथे आहे. तोही कर्नाटकातील सिमेंट कंपन्यांत जाळण्यासाठी पाठवला जाणार आहे. टाळेबंदीनंतर ही कामे प्राधान्याने केली जातील असे त्यांनी सांगितले.

एक एप्रिल ते १४ एप्रिल काळात राज्यभरातील रस्त्यांच्या कडेला असलेला कचरा संकलितक करणे सुरु केले आहे. साऴगाव येथील कचरा प्रक्रीया प्रकल्पात हा संकलीत केलेला कचरा पाठवला जात आहे.
लेविनसन मार्टिन्स, संचालक कचरा व्यवस्थापन

संबंधित बातम्या