राज्यातील तळीरामना खुश खबर!

राज्यातील तळीरामना खुश खबर!

पणजी,

राज्यात टाळेबंदी येत्या १७ मे पर्यंत कायम ठेवताना मद्यालये (बार) बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे मात्र घाऊक व किरकोळ मद्य दुकाने खुली करण्यास परवानगी दिल्याने तळीरामांना दिलासा मिळाला आहे. त्यासंदर्भातचा आदेश सरकारने जारी केल्याने ही दुकाने उद्यापासून (४ मे) खुली होणार आहेत. ही दुकाने संध्याकाळी ६ नंतर बंद करण्याची अट घालण्यात आली आहे.
घाऊक किंवा किरकोळ मद्य दुकाने संध्याकाळी ६ वाजण्यापूर्वी बंद करणे सक्तीचे आहे. दुकानासमोर सामाजिक अंतर ठेवून तसेच मास्क वापरून एकावेळी पाचजणांनाच रांगेत उभे राहण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे या नियमांचे पालन करूनच या विक्रेत्यांना मद्य व्यवसाय सुरू करावा लागणार आहे. मद्यविक्री बंद असलेल्या काळात चोरीच्या मार्गाने राज्यात मद्यविक्री होत होती. अबकारी खात्याने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी किरकोळ तसेच घाऊक व त्यांच्या गोदामावर छापे टाकले होते. या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात मद्यसाठा जप्त करून गोदामांना सील ठोकले होते. टाळेबंदीच्या काळात खात्याने सुमारे १९३ दुकाने सील केली आहेत.
केंद्र सरकारच्या टाळेबंदी मार्गदर्शक सूचनांनुसार मद्यविक्री बंदी असली आहे मात्र गोवा हा ग्रीन झोनमध्ये असल्याने राज्यांना शिथिलता करण्यात मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार सरकारने हा मद्यविक्रीच्या दुकानांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला. सुमारे १३०० मद्य दुकाने गोव्यात आहेत ती खुली होणार आहेत. ही मद्य दुकाने खुली होणार असली तरी ७० टक्के पर्यटनातून व्यवसाय मिळतो तो कमी झाला आहे. स्थानिक लोकांकडून ३० टक्केच मद्य व्यवसाय मिळतो. एका महिन्यानंतर पावसाळा सुरू होणार आहे व कोविड - १९ या काळात राज्यात पर्यटकांना प्रवेशबंदी असल्याने कोणीही पर्यटक गोव्याकडे फिरकणार नाही. त्यामुळे लॉकडाऊन तसेच पर्यटनामुळे मोठा फटका या व्यवसायाला बसला आहे. मद्य उत्पादन कारखान्यांनाही कच्चा मिळण्यास अडचणी येत असल्याने सध्या असलेला मद्यसाठा पुढील दोन आठवड्यासाठीच पूरक ठरेल असे अखिल गोवा मद्य व्यापार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले आहे.
देशात टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढविण्यात आल्यावर राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने टाळेबंदी दुसऱ्यांदा वाढविताना त्यामध्ये काही प्रमाणात शिथिलता केली होती. राज्यात असलेले सर्व कोरोना बाधित रुग्ण उपचारात बरे झाल्याने सरकारने हळूहळू राज्यातील काही दुकान धारकांना सामाजिक अंतर तसेच मास्कची सक्ती ग्राहकांना करण्याची अट घालून दुकाने खुली केली होती. त्यावेळी मद्य दुकानधारकांनाही त्याच अटी लादून परवानगी देण्याची विनंती मद्य व्यापार संघटनेने केली होती मात्र त्याला नकार दिला होता. केंद्रानेच मद्यविक्रीवर निर्बंध घातल्याने सरकारनेही त्यात हस्तक्षेप करण्याचे टाळले होते. मात्र तिसऱ्यांदा टाळेबंदीत वाढ केंद्राने केल्याने व ती गोव्यातही कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर कोविड - १९ ची मार्गदर्शक सूचनांचे पालन करून मद्य दुकाने खुली करण्यास परवानगी दिली आहे.

अबकारी महसुलात घट
गोव्याचा मद्य व्यवसाय हा पूर्णपणे राज्यात येणाऱ्या देशी व विदेशी पर्यटकांवर अवलंबून असतो. या व्यवसायत पर्यटन मोसमात कोट्यवधीची उलाढाल होत असते व त्यातून अबकारी खात्याला महिना सरासरी ३० ते ५० कोटीपर्यंत विविध कराच्या स्वरुपात महसूल मिळतो. यावर्षी कोविड - १९ मुळे पर्यटन क्षेत्र कोलमडल्याने अबकारी खात्याला गेल्या आर्थिक वर्षात ठेवण्यात आलेले सुमारे ४५० कोटींचे लक्ष्य पूर्ण करता आले नाही. मद्य व्यवसाय बंद असल्याने त्याचा फटका अबकारी खात्याच्या महसुलालाही बसला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com