कोरोनामुक्त राज्यासाठी घाई नको, `आप`चा सरकारला सल्ला

Dainik Gomantak
मंगळवार, 14 एप्रिल 2020

कोरोनाच्या साथीला आटोक्यात आणण्यासाठी एक प्रमेय ठरवून तपासणी करा. टाळेबंदीच्या काळात ज्या प्रमाणात लोकांची कोविड-१९ चाचणी व्हायला हवी तशी होत असल्याचे दिसत नसल्याचे निदर्शनास येत आहे.असा आरोप आपने केला आहे.

पणजी,
राज्य सरकारने हागणदारीमुक्त राज्य जाहीर करण्यासाठी जशी घाई केली होती तशी घाई राज्य कोरोनामुक्त म्हणून जाहीर करण्यासाठी करू नये असा सल्ला आम आदमी पक्षाने दिला आहे. पक्षाचे नेते वाल्मिकी नाईक यांनी जारी केलेल्या पत्रकातून हा सल्ला देण्यात आला आहे.
पत्रकात म्हटले आहे, की,कोरोनाच्या साथीला आटोक्यात आणण्यासाठी एक प्रमेय ठरवून तपासणी करा. टाळेबंदीच्या काळात ज्या प्रमाणात लोकांची कोविड-१९ चाचणी व्हायला हवी तशी होत असल्याचे दिसत नसल्याचे निदर्शनास येत आहे.असा आरोप आपने केला आहे. सरकारने कोरोनाच्या बाधेची लक्षणे नसलेल्यांकडे दुर्लक्ष करू नये.कोरोनाग्रस्त देशांमधील अहवाल दाखवतात की, टाळेबंदी विषाणूचा फैलाव काही काळ रोखू शकते मात्र त्यामुळे परिस्थिती कायमस्वरुपी नियंत्रणात आल्याचे दिसत नाही. त्यासाठी या काळात लोकांच्या तपासण्या करून लक्षणे असलेल्यांचे विलगीकरण व उपचार केल्यास परिस्थिती नियंत्रणात येते. त्यामुळे त्याचा अवलंब केला जावा.
लक्षणे असोत वा नसोत, चाचण्यांची संख्या वाढवणे व लक्षणे आढळल्यास त्यांना विलगीकरण करणे, हे सूत्र लक्षात ठेवून काम करणे, ही काळाची गरज आहे.या महिन्याच्या अखेरीपर्यंत प्रति लाख लोकांमागे १५०० चाचण्या कराव्चयात. होम क्वारंटाईन केलेल्या किमान २० टक्के व्यक्तींच्या चाचण्या कराव्यात. डॉक्टर्स, नर्सेस, रुग्णवाहिका कर्मचारी, स्वच्छता कामगार तसेच आरोग्य व स्वच्छता कामात गुंतलेले इतर कर्मचारी यांच्यावरदेखील किमान ५० टक्के चाचण्या करणे, हितावह ठरेल. विविध शहरांलगत असलेल्या झोपडपट्ट्या, दाटीवाटीने बांधलेली गावातील घरे, वाडे अशा अनेक ठिकाणी या चाचण्या काटेकोरपणे व नियमानुसार करणे, कोरोना नियंत्रणासाठी गरजेचे आहे. तसेच सरकारी कार्यालये चालू केल्याने कदंबा कर्मचारी, विविध कर्मचारी व अधिकारी, एनजीओजमधील कर्मचारी व स्वयंसेवक, सर्व आवश्‍यक सेवा वाहन चालक व कोणत्याही कारणास्तव गोव्याच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या लोकांची जरुर पडल्यास प्रत्येकाची कोरोना चाचणी करणे, हेच आपल्या हातात आहे व तेच आपले लक्ष्य असायला हवे. फिरत्या पथकाद्वारे सर्वसामान्य लोकांची चाचणी करणे, हितावह ठरेल, असा सल्ला आपने दिला आहे.

संबंधित बातम्या