सरकारी कार्यालये मंगळवारपासून सुरू

Dainik Gomantak
शनिवार, 18 एप्रिल 2020

सरकारी कार्यालये  मंगळवारपासून सुरू 

पणजी, 

२१ एप्रिलनंतर पोलिस, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा, अग्‍निशमन व आपत्‍कालीन सेवा, आपत्ती व्यवस्थापन, कारागृह आणि पालिका सेवा ही खाती पूर्णतः सुरू होणार आहेत. त्याशिवाय सर्व खात्यांतील ‘अ’ व ‘ब’ वर्गीय अधिकारी कामावर रुजू होणार असून इतर कर्मचाऱ्यांपैकी ३३ टक्के कर्मचारी एका दिवशी कामावर हजर होतील. यातील एक तृतीयांश कर्मचारी एकावेळी कामावर येतील, असेही नियोजन सरकारने केले आहे. राज्याच्या सर्वसाधारण प्रशासन खात्याने आज तसा आदेश जारी केला आहे.
सरकारची इतर खाती मर्यादित कर्मचाऱ्यांसह सुरू असतील. ‘अ’ व ‘ब’ वर्गीय अधिकाऱ्यांनी कामावर हजर होणे आवश्यक आहे. ‘क’ वर्गीय कर्मचारी व इतरांतील मिळून ३३ टक्के जण कामावर एकावेळी उपस्थित असावेत. समाज अंतर पाळून त्यांनी काम करावे. सार्वजनिक सेवा या कार्यालयांतून सुरू केली जावी. मात्र, सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जावे. जिल्हा प्रशासन व कोषागार खाती सुरू राहतील आणि त्यातून सार्वजनिक सेवा दिली जाईल. त्यासाठी कर्मचारी नेमले जातील. वन खात्याची प्राणीसंग्रहालये, बगीचे अभयारण्यातील गस्त, वनांतील गस्त ही कामे सुरू राहतील, असे आदेशात नमूद केले आहे.
 

संबंधित बातम्या