गोमंतकियांना १ फेब्रुवारीपासून कसिनो प्रवेश बंद  

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

कसिनोंमध्ये गोमंतकियांना प्रवेश बंद
उद्यापासून अंमलबजावणी, मुख्यमंत्र्यांची माहिती

कसिनोंवर गोमंतकियांना प्रवेश बंद करण्याचा निर्णय गेमिंग कमिशन नसल्याने लांबणीवर पडला होता.सध्या व्यावसायिक कर आयुक्तांवरच या गेमिंग कमिशनची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पणजी: राज्यातील कसिनोंमध्ये गोमंतकियांना प्रवेश बंद केला जाणार आहे व त्याची अंमलबजावणी १
फेब्रुवारीपासून केली जाणार आहे.यासंदर्भातील अधिसूचना उद्यापर्यंत काढली जाईल.कसिनोंमध्ये काम करणाऱ्या गोमंतकियांना यातून वगळण्यात येईल. मात्र, त्यांना तेथे जुगार खेळता येणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.या कठोर निर्णयामुळे जुगार खेळणाऱ्यांना कसिनोची दारे बंद झाली आहेत.

सापडल्‍यास दंडात्‍मक कारवाई
व्यावसायिक कर आयुक्तांची गेमिंग कमिशन म्हणून नियुक्ती केली आहे. त्यासाठी कायद्यानुसार आवश्‍यक असलेले नियम व नियमावली ते तयार करतील. कसिनोंवर जाणाऱ्या व्यक्तींची तपासणी करण्यासाठी अधिकारी नेमण्याचा अधिकारही कमिशनचा असेल. या गेमिंग कमिशननुसार दंडात्मक कारवाई किती असावी, तसेच अनेकवेळा एखादी गोमंतकीय व्यक्ती कसिनोवर गेलेली सापडल्यास दंडात्मक कारवाई काय असावी, यासंदर्भात गेमिंग कमिशनर मसुदा तयार करून तो सरकारकडे पाठवेल. त्यावर सरकार निर्णय घेईल, असे डॉ. सावंत म्हणाले. गोमंतकियांना येत्या १ फेब्रुवारीपासून कसिनो प्रवेश बंद असेल व त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
 

ओळखपत्रे तपासणार
सरकारच्या या निर्णयामुळे कसिनोवर जुगार खेळण्यास जाणाऱ्यांची चांगलीच अडचण झाली आहे. कसिनो व्यवस्थापनालाही कसिनोवर येणाऱ्यांची ओळखपत्रे तपासावी लागणार आहेत. त्यामुळे या व्यवस्थापनाचीही जबाबदारी वाढली आहे. त्यांनाही गोमंतकियांना प्रवेश देता येणार नाही. प्रवेश दिल्यास त्यांच्याविरुद्धही कारवाई होण्याची शक्यता आहे. कसिनो प्रवेशासाठी कोणती ओळखपत्रे ग्राह्य असतील त्यासंदर्भातही गेमिंग कमिशनतर्फे तयार करण्यात येणाऱ्या नियमांमध्ये उल्लेख केला जाणार आहे. गोमंतकीय युवा पिढी कसिनोकडे जुगार खेळण्यासाठी जात असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने हा कोठर निर्णय घेतला आहे.

 

 

सरकारी कामकाजाचा अजब नमुना : सरकारी वकिलांचा मंत्र्याच्या आदेशाला आक्षेप

संबंधित बातम्या