जलस्रोत खाते असे ठेवणार लक्ष

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

व्यावसायिक टँकरमध्ये बसणार ‘जीपीएस' यंत्रणा!
अपरिमित पाणी उपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी जलस्रोत खात्याचे पाऊल

काही टँकर एकापेक्षा अधिक ठिकाणी पाणीपुरवठा करतात, त्यासाठी असे टँकर वाहतूक खात्याकडे वाहन परवान्यासाठी नोंदणी करतात. त्या टँकरमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्यासाठी जलस्रोत खाते लवकरच वाहतूक विभागाशी संपर्क साधणार आहे. विहिरींच्या पाण्याचे दूषित होण्याच्या तक्रारी आल्यानंतर, खात्याच्या मुख्यालयातील प्रयोगशाळेत त्या पाण्याची तपासणी केली जाते.

पणजी : व्यावसायिक टँकरद्वारे होणाऱ्या भूजलाच्या अधिकतर उपशावर जलस्रोत खात्याने आता लक्ष ठेवण्यासाठी टँकरमध्ये ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (जीपीएस) जीपीएस यंत्रणेचा वापर करण्याचे ठरविले आहे. अशी यंत्रणा बसविल्यानंतर टँकरमधून किती पाणी उपसा होत आहे, हे खात्याच्या लक्षात येणार आहे. त्यासाठी लवकरच जलस्रोत खाते वाहतूक खात्याशी संपर्क साधणार आहे.
जलस्रोत खात्याने राज्यातील जनतेला मोकळ्या विहिरींची नोंदणी करण्याच्या केलेल्या आवाहनानुसार या खात्याकडे ६ हजार ५०२ विहिरी नोंदल्या गेल्या आहेत, त्याशिवाय १ हजार २५ कूपनलिका नोंदणीकृत आहेत.

या खात्याच्या मुख्य अभियंत्याच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेली समिती विहिरींची पाण्याची पातळी महिन्यातून एकदा तपासते. उद्योगांसाठी, बांधकामांकरिता आणि व्यावसायिक हेतूने व्यक्तींकडून विहिरींमधून अधिकतर पाणी उपसा करण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे अशा ठिकाणच्या अर्जांच कटाक्षाने छाननी केली जाते. विशेष म्हणजे नुकतेच मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामासाठी चार विहिरी खोदण्याकरिता परवानगी या खात्याकडे मागितली गेली होती, परंतु समितीने केवळ एकाच विहिरीला परवानगी दिली आहे. विहीर खोदण्यासाठी अर्ज आल्यावर तिची तांत्रिक मर्यादा तपासली जाते. जर कोणी नव्या विहिरीसाठी परवानगी मागितली तर त्या ठिकाणापासून १०० मीटरच्या आत कोणाची विहीर आहे का नाही, ते तपासले जाते. त्यानंतरच त्या विहिरीच्या परवानगीचा विचार खाते करते.

‘भूजला’साठी २७७ परवानग्या
गतवर्षी २०१९ मध्ये भूजल काढण्यासाठी २७७ परवानग्या दिल्या गेल्या. पाणी वाहतुकीसाठी १३२ आणि १५१ पाण्याच्या टँकर परवान्यांचे नूतनीकरण खात्याने केले आहे. त्याशिवाय असलेली विहीर बुजवून नंतर परवानगी मागताना नियमाचे उल्लंघन करणाऱ्या सात विहिरींची तपासणी करण्यात आली आहे. पाण्याच्या टँकरद्वारे निश्‍चित पाणी उपसा किती होतो, हे तपासणे सध्या गरजेचे बनले आहे. सध्या टँकर व्यवसाय तेजीत असल्याने विहिरींतून पाणी मोठ्या प्रमाणात उपसा केले जात आहे. त्यासाठी जीपीएस यंत्रणा महत्त्वाची असल्याने ती यंत्रणा व्यावसायिक टँकरमध्ये बसविल्यावर पाणी उपशावर लक्ष ठेवता येणार आहे.

 

मुंबई उच्च न्यायालयाचा नवीन आदेश

संबंधित बातम्या