गोव्यासाठी `पाहुणे` क्रिकेटपटू महत्त्वाचे

किशोर पेटकर
गुरुवार, 23 एप्रिल 2020

गोव्यासाठी `पाहुणे` क्रिकेटपटू महत्त्वाचे

 

पणजी नव्या क्रिकेट मोसमाचे नियोजन करताना गोवा क्रिकेट असोसिएशनला (जीसीए) `पाहुणे` (व्यावसायिक) खेळाडू निवडीचाही निर्णय घ्यावा लागेल. कोरोना विषाणू संसर्ग लॉकडाऊनमुळे जीसीएचा प्रशासकीय कारभार ठप्प आहे, पण लवकरच पूर्ववत होणार असून संघ बांधणीचा विषय व्यवस्थापकीय समितीसाठी अग्रक्रमाने असेल.

गतमोसमात कर्नाटकचा अष्टपैलू अमित वर्मा आणि गुजरातचा स्मित पटेल गोव्याकडून खेळले होते. रणजी करंडक प्लेट गटात दोघांनीही निवडीस न्याय दिला, त्यामुळे गोव्याच्या एलिट गट प्रवेशास बळ प्राप्त झाले. अमितने गोव्याच्या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही पेलली. सलग दुसऱ्या रणजी क्रिकेट मोसमात अमितचा खेळ गोव्यासाठी परिणामकारक ठरला. अमित आणि स्मित यांना संघात राखण्यापूर्वी जीसीएला या खेळाडूंच्या नव्या करारप्रक्रियेची पूर्तता करावी लागेल.

प्राप्त माहितीनुसार, गोव्याचे क्रिकेट  प्रशिक्षण संचालक प्रकाश मयेकर यांच्या संपर्कात अमित व स्मित आहेत, पण त्यांच्या कराराचे नूतनीकरण न झाल्यामुळे या दोघाही क्रिकेटपटूंना जीसीएच्या ऑनलाईन तंदुरुस्ती शिबिर प्रक्रियेत अधिकृतपणे सामावून घेण्यात आलेले नाही. या दोघाही क्रिकेटपटूंनी आपापल्या घरी जीसीएच्या फिजिओने आखून दिलेल्या तंदुरुस्ती कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे.

गतमोसमातील रणजी क्रिकेट स्पर्धेत डावखुऱ्या अमितने १० सामन्यांत ४ शतके व ४ अर्धशतकांच्या मदतीने ६५.२३च्या सरासरीने ८४८ धावा केल्या होत्या. लेगस्पिन गोलंदाजीने प्रभाव पाडताना १५.७४च्या सरासरीने अमितने ४३ विकेट्स मिळविल्या होत्या. ४ वेळा त्याने डावात ५ गडी बाद करण्याची किमया साधली. स्मित सुद्धा गतमोसमात १० रणजी सामने खेळला. त्याने ६६.५८च्या सरासरीने ७९९ धावा केल्या. यामध्ये ३ शतके व ३ अर्धशतकांचाही समावेश होता. यष्टिरक्षक या नात्याने त्याने २० झेल आणि २ यष्टिचीत अशी कामगिरी केली.

 गोव्यातर्फे अमित वर्माची रणजी क्रिकेट कामगिरी

मोसम सामने धावा शतके अर्धशतके बळी डावात ५ बळी

२०१८-१९ ९ ५४९ २ २ १३ १

२०१९-२० १० ८४८ ४ ४ ४३ ४

एकूण १९ १३९७ ६ ६ ५६ ५

 

संबंधित बातम्या