म्हापशात ३० वर्षांनी गटार सफाई

Dainik Gomantak
मंगळवार, 21 एप्रिल 2020

म्हापसा बाजारातील एकूण सर्वच्या सर्व गटारे एकाच वेळी उपसण्याची गोवामुक्‍तीनंतरच्या काळात ही पहिलीच वेळ आहे, अशी प्रतिक्रिया काही व्यापाऱ्यांनी व्यक्‍त केली आहे.

सुदेश आर्लेकर
म्हापसा

म्हापसा बाजारपेठेतील गटारे सध्या तब्बल ३० वर्षांनी उपसण्यात आली आहेत. ‘कोरोनो’मुळे म्हापसा बाजारपेठ गेल्या सुमारे महिनाभर पूर्णत: बंद असल्याने पालिकेला गटारे उपसण्याची चांगल्यापैकी संधी मिळाली आहे.
म्हापसा बाजारातील एकूण सर्वच्या सर्व गटारे एकाच वेळी उपसण्याची गोवामुक्‍तीनंतरच्या काळात ही पहिलीच वेळ आहे, अशी प्रतिक्रिया काही व्यापाऱ्यांनी व्यक्‍त केली आहे. या पूर्वी बाजारातील एक दोन गटारे दरवर्षी उपसली जात होती. सर्वच्या सर्व गटारांचे सफाईकाम कदापि हाती घेण्यात आले नव्हते. ही बाजारपेठ दीर्घकाळ कधीच बंद नव्हती. आता तब्बल ३० वर्षांनी या योग जुळून आला. हा काळ त्यापेक्षाही जास्त असू शकतो.
म्हापसा बाजारात गेल्या सुमारे तीस वर्षांत एवढ्या मोठ्या प्रमाणात गटारांचे साफसाफाई काम कधीच हाती घेतले नव्हते. यासंदर्भात येथील व्यापारी व काही आजी माजी नगरसेवकांनीही दुजोरा दिला. माजी नगराध्यक्ष आशिष शिरोडकर यांच्या अध्यक्षपदाखाली कार्यरत असलेल्या म्हापसा व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या मुद्द्याबाबत सहमती दर्शवली. या कामाबाबत खरोखरच पालिकेचे मुख्याधिकारी क्‍लेन मदेरा यांचे अभिनंदन करावे लागेल, अशी प्रतिक्रिया म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आशीष शिरोडकर आणि उपाध्यक्ष नरेश तिवरेकर यांनी व्यक्‍त केली.
नगराध्यक्ष रायन ब्रागांझा सातत्याने देखरेख ठेवून आहेत. तसेच एक दोन वेळा स्थानिक आमदार जोशुआ डिसोझा यांनीही कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना उपयुक्‍त सूचनाही केलेल्या होत्या.
दरम्यान, या गटारांच्या साफसफाईमुळे कित्येक धक्‍कादायक गोष्टीही नजरेसमोर आलेल्या आहेत. काही व्यापाऱ्यांनी अथवा दैनंदिन विक्रेत्यांनी गटारांवर अथवा फूटपाथवर अतिक्रमण करून स्वत:चे व्यवसाय तिथे इतकी वर्षे थाटलेले आहेत, हे समोर आलेले आहे. पालिका मंडळाशी जवळीक साधून ते विक्रेते तिथे नियमबाह्य पद्धतीने व्यवसाय करीत असल्याने त्यांचे आता बिंग फुटले आहे.

विधायक कार्याचे अभिनंदन करावेच लागेल...
व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष नरेश तिवरेकर म्हणाले, म्हापसा बाजारपेठ शहराच्या सखल भागात असल्याने बाजारपेठेत पाणी साचून राहते. त्यामुळे परिसरातील उंचवट्याच्या भागांतही गटारे आणि ओहोळ यांची नित्यनेमाने दरवर्षी दुरुस्ती व साफसफाई करणे गरजेचे असते, हे ध्यानात ठेवले पाहिजे. सध्या मुख्याधिकारी गटारांच्या साफसफाईच्या बाबतीत खूपच स्वारस्य दाखवून काम करीत आहेत. मी स्वत: कॉंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे; तथापि, अशा विधायक कार्याबाबत श्री. मदेरा व पालिका मंडळावर सत्ता असलेल्या भाजपाच्या नेत्यांचे अभिनंदन करावेच लागेल.

आतापर्यंत म्हापसा बाजारपेठ सलगपणे पंधरा वीस दिवस कधीच बंद नव्हती. रविवारी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही लोकांची वर्दळ बाजारपेठेत असायची. त्यामुळे, गटाराच्या सफाईकामात व्यत्यय यायचा. सध्या बाजारपेठ बंद असल्याने म्हापसा पालिकेला मनासारखे काम करता आले. अगदी दुकानांच्या आणि अन्य गाळ्यांच्या खालून जाणाऱ्या गटारांमधील गाळ काढणे शक्‍य झाले.
-संदीप फळारी (नगरसेवक)

...तरच बाजारपेठेला
गतवैभव प्राप्त होईल

येथील एक व्यापारी तथा सामाजिक कार्यकर्ता सुदेश तिवरेकर म्हणाले, बाजारपेठेतील रस्ते आणि फूटपाथ मोकळे ठेवावेत अशा आशयाचा आदेश न्यायपालिकेने दिलेला असल्याने नजीकच्या काळात त्या आदेशाचे पालन मुख्याधिकारी क्‍लेन मदेरा करतात की नाही, हे आता पाहावे लागेल. दयानंद नार्वेकर नगरविकास मंत्रीपदावर असताना म्हापशातील सर्व फूटपाथ व रस्ते मोकळे करून देण्यात आले होते, तशाच प्रकारची धमक इतर राजकर्त्यांनी तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी दाखवावी. तेव्हाच म्हापसा बाजारपेठेला गतवैभव प्राप्त होईल.

म्हापसा व्यापारी संघटनेची महत्त्वपूर्ण भूमिका...

म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आशिष शिरोडकर म्हणाले, गटारांचे सफाईकाम हाती घेण्यात आले तेव्हा ते व्यवस्थित होत नसल्याची तक्रार संघटनेने मुख्याधिकाऱ्यांकडे केली असता, मुख्याधिकारी क्‍लेन मदेरा यांनी त्यात व्यक्‍तिश: लक्ष घालून त्या कामाचे स्वत: परीक्षण करून ते काम करून घेत आहेत. संघटनेने यासंदर्भात बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे आता त्या कामात कमालीची सुधारणा होत आहे. त्यामुळे मदेरा यांनी केलेल्या चांगल्या कामाबाबत त्यांचे कौतुक करावे लागेल. यापुढे बाजारपेठेत जलवाहिनी तसेच दूरध्वनी व वीज यांच्या भूमिगत वाहिनींचे काम बाजारात व्हायचे आहे. सध्या ‘कोविड-१९’च्या पार्श्‍वभूमीवर अशी कामे निदान महिनाभर तरी करणे शक्‍य नाही, हे मान्यच आहे; तथापि, नजीकच्या काळात अशी कामे मुख्याधिकाऱ्यांनी प्राधान्यक्रमाने करून घ्यावीत.

साठ कर्मचारी कार्यरत
बाजारपेठेची साफसफाई करण्यासाठी सध्या प्रतिदिन सुमारे साठ कर्मचारी कार्यरत आहेत. हे काम पालिकेच्या नियमित कामगारांकडून करून न घेता म्हापसा पालिका क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या अन्य कामगारांकडून रोजंदारी पद्धतीने करून घेण्यात येत आहे, अशी माहिती पालिकेचे मुख्य अभियंता हुसेन शहा मुजावर ऊर्फ मुन्ना यांनी दिली.

संबंधित बातम्या