खाण भागात हळदीकुंकू उत्सवाला कात्री!

Dainik Gomantak
सोमवार, 20 जानेवारी 2020

पाळी

पाळी

बंद खाणींचा परिणाम आता खाण भागातील जनजीवनावर प्रकर्षाने जाणवू लागला आहे. रोजीरोटीसाठी धडपडणाऱ्या खाण अवलंबितांना आपल्या इच्छा आकांक्षांना मुरड घालण्याची वेळ आली आहे. खाणी बंद झाल्यापासून रोजीरोटीसाठी खाण अवलंबितांना खाणेतर भागात धाव घ्यावी लागली असून रोजंदारीवर काम करताना हातात येणाऱ्या पगारात भागवायचे कसे, असा सवाल या खाण अवलंबितांनी केला आहे. त्यात सणासुदीलाही मर्यादा आली असून महिलांचा आवडता हळदीकुंकूचा समारंभही आता थोडक्‍यात आटोपता घेण्याची पाळी महिला वर्गावर आली आहे.
वास्तविक दरवर्षी येणाऱ्या हळदी-कुंकू समारंभात राज्यभरातील बहुतांश महिला सहभागी होतात. खाण भागातही हळदीकुंकूचा समारंभ गेल्या अनेक वर्षांपासून साजरा केला जात आहे. या उत्सवानिमित्त एकमेकांची ओळख वाढवणे, एकमेकांच्या घरी जाऊन स्नेह वाढवणे या गोष्टींवर भर द्यायला मिळत असल्याने सुवासिनी या हळदी-कुंकू समारंभात मोठ्या उत्साहात भाग घेतात. आतापर्यंत खाण भागात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पण २०१२ व त्यानंतर २०१८ मध्ये खाणी अचानकपणे बंद झाल्याने जो काही तुटपुंजा रोजगार होता, तोही गायब झाल्याने खाण अवलंबित हवालदिल झाले आहेत. हातात पैसा येत होता, तोपर्यंत ठीक होते, आता रोजगारही नाही आणि पैसाही नाही, अशी स्थिती खाण अवलंबितांची झाली असून खाण कंपन्यांनी तर खाण कामगारांना सरळ घरचा रस्ता दाखवल्याने लोकांचे अतिशय हाल झाले आहेत.
हळदीकुंकू समारंभासाठी खाण भागात मोठ्या प्रमाणात महिला एकमेकींच्या घरी जात असल्याने त्यासाठी मोठा खर्चही येतो. एका सुवासिनीसाठी किमान तीन ते चार हजार रुपये खर्च हा अपेक्षित असतो. हळदीकुंकूचे साहित्य आणि एखादी छोटी भेटवस्तू असे या कार्यक्रमाचे स्वरुप असते. त्यातच घरी आलेल्या सुवासिनींचे काहीजणी चहापान, सरबत किंवा फळे देऊन करतात, त्यामुळे हा खर्च वाढतो. आतापर्यंत हा खर्च करणे सोपे होते, पण आता रोजगारच नसल्याने खर्च करायचा कसा असा सवाल खाण भागातील महिलांनी केला आहे. त्यामुळे हळदीकुंकूचा समारंभ आहे, पण खर्चाला कात्री लावण्याची पाळी आली असल्याची प्रतिक्रिया या महिलांनी व्यक्त केली आहे.

प्रत्येक गावात किमान ३०० सुवासिनी...
खाण भागात प्रत्येक गावात हळदीकुंकू समारंभ साजरा केला जात असून प्रत्येक गावात किमान तीनशे सुवासिनी या उत्सवात सहभागी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी वाड्यापुरते हा उत्सव मर्यादित असल्यास हा आकडा शंभराच्या आसपास येतो.
 

संबंधित बातम्या