आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Dainik Gomantak
गुरुवार, 2 जानेवारी 2020

कॉंग्रेस पक्षात दोन तृतीयांश फुट न पडल्याने पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत हे आमदार अपात्र ठरतात.

पणजी

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या दहा आमदारांना अपात्र ठरवावे, अशी मागणी करणारी याचिका सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे सादर केली होती. त्या याचिकेवर लवकर सुनावणी घ्यावी, अशी मागणी चोडणकर यांनी एक अर्ज सभापतींना सादर करून आज केली.
नीळकंठ हळर्णकर (थिवी), आतानासिओ मोन्सेरात (पणजी), जेनिफर मोन्सेरात (ताळगाव), आंतोनिओ फर्नांडिस (सांताक्रुझ), फ्रांसिस सिल्वेरा (सांतआंद्रे), विल्फ्रेड मिस्कीता (नुवे), फिलीप नेरी रॉड्रिग्ज (वेळ्ळी), क्लाफासियो डायस (कुंकळ्ळी), इजिदोर फर्नांडिस (काणकोण) आणि चंद्रकांत कवळेकर (केपे) या आमदारांविरोधात ही याचिका त्यांनी सादर केली आहे. कॉंग्रेस पक्षात दोन तृतीयांश फुट न पडल्याने पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत हे आमदार अपात्र ठरतात, असा दावा चोडणकर यांनी केला आहे. या याचिकेवर शक्य तितक्या लवकर सुनावणी घ्यावी अशी विनंती चोडणकर यांनी आज आपल्या वकीलांकरवी केली.
घटनेच्या कलम १९१(२) व दहाव्या परीशिष्टानुसार आमदारांची ही कृती पक्षांतर बंदी कायद्याखाली त्यांना अपात्र ठरण्यास भाग पाडते असे चोडणकर यांनी आज सादर केलेल्या अर्जात नमूद केले आहे. त्यांनी मूळ याचिका ८ ऑगस्ट २०१९ रोजी सादर केली होती. त्यानंतर याचिकेवर २३ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली होती. १५ ऑक्टोबरला त्यानंतरची प्राथमिक सुनावणी झाली होती. या याचिकेवर आता पाच महिन्यात सुनावणी न झाल्याने विनाकारण विलंब होत आहे. या याचिकेवर निर्णय न घेतल्याने या याचिकेतील प्रतिवादी सत्तेत राहू शकत आहेत. त्यामुळे या याचिकेवर वेळेत निर्णय घ्यावा अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे. या याचिकेवर निर्णय घेण्यास होणारा विलंब हा याचिका सादर करण्याच्या हेतूविरोधात आहे. न्यायाला उशीर म्हणजेच न्याय नाकारण्यासारखे असल्याने या याचिकेवर प्राधान्याने सुनावणी घ्यावी, असे चोडणकर यांनी नमूद केले आहे.

संबंधित बातम्या