हापूसच्या दर्जाविषयी प्रश्‍नचिन्ह..!

Dainik Gomantak
गुरुवार, 30 एप्रिल 2020

राज्यात देवगड-रत्नागिरीमधून आंब्याची आवक वाढली

पणजी,

देवगड-रत्नागिरीमधून सध्या गोव्यात मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची आवक होत आहे. हापूस आंबा ज्या चवीसाठी ओळखला जातो, तो हापूसच आहे का याविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहेत. आंबा पूर्णपणे पिकल्याचा दिसत असला तरी तो आतून चवीने आंबट निघत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ग्राहकांची मोठी फसवणूक होत असून, असाच एक प्रकार वास्कोमध्ये मानकुराद आंब्याविषयी घडला होता.
सध्या बाजारात आणि ठिकठिकाणी वाहनातून हापूस आंब्याची विक्री होत आहे. भाजीपाला-फळे विक्रेत्यांनीही हापूस आंबा विक्रीसाठी ठेवला आहे. काही ठिकाणी हा आंबा चारशे रुपये किलो, तर काही ठिकाणी ४५० ते ६०० रुपये डझन असे विकले जात आहेत. सध्या टाळेबंदी शिथील झाल्याने या आंब्याला ग्राहकही आता चांगला उपलब्ध होत आहे, परंतु वरून पिवळा-केसरी दिसरा आणि पूर्णपणे पिकलेला दिसत असलेला हापूस आंबा घरी नेऊन कापल्यानंतर तो आंबट निघत आहे. त्यामुळे हे आंबे वरून रंग येण्यासाठी औषध मारून पिकविले जात आहेत की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
सांतिनेज येथील भाजीपाला-फळे विक्रेत्याकडून ग्राहकाने घेतलेल्या आंब्याची माहिती दिल्यानंतर आणखी दोन दिवस थांबा, म्हणजे पूर्ण पिकतील असा सल्ला त्याने ग्राहकाला दिला. यावरून आंब्याच्या चवीची त्या दुकानदाराला कल्पना आहे की नाही किंवा ग्राहकाला फसविण्याचा हा प्रकार आहे, हे समजत नाही.
दरम्यान, राज्यात येणाऱ्या आंब्याची प्रत किंवा त्याचा दर्जा अन्न व प्रशासन खात्याकडून तपासला गेला आहे का, याविषयी त्या खात्याच्या संचालक ज्योती सरदेसाई यांच्याशी ‘गोमन्तक'ने संपर्क साधला असता, त्यांनी आपला मोबाईल कॉल स्वीकारला नाही. त्यामुळे खात्याच्या तपासणीविषयी अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

 

गोवा गोवा 

संबंधित बातम्या