गोव्यात आरोग्य सर्वेक्षणाला मोठा प्रतिसाद

Dainik Gomantak
गुरुवार, 16 एप्रिल 2020

पणजी लगत मंत्रालय, विधानसभा संकुल, सचिवालय आणि महत्वाची सरकारी कार्यालये असलेल्या पर्वरी पठारावरील कोविड १९ आरोग्य सर्वेक्षणाला जनतेने मोठा प्रतिसाद दिला.

पणजी,
गोव्यात गेले तीन दिवस सुरु असलेल्या आरोग्य सर्वेक्षणाला जनतेने मोठा प्रतिसाद दिला. घरातील कोणाला कोविड १९ च्या संसर्गाची लक्षणे आहेत तर अनेकांनी तशी माहिती न लपवता सरकारी कर्मचाऱ्यांना दिली. पावणेसात हजार सर्वेक्षकांनी तीन दिवसात मिळून गोव्यातील सर्व घरे या सर्वेक्षणासाठी पिंजून काढली.
या तीन दिवसात या सर्वेक्षकांनी ४ चाळ ३९ हजार ६६६ घरांना भेटी दिल्या. सुमारे ४ हजारांहून अधिक वाड्यांवर १२ तालुक्यांत हे सर्वेक्षण एकाचवेळी करण्यात आले. घरातील कोणी १५ फेब्रुवारीनंतर राज्याबाहेर प्रवास केला आहे का, घरातील कोणी १५ फेर्बुवारीनंतर राज्याबाहेर प्रवास करणाऱ्यांच्या संपर्कात आला होता का याची माहिती संकलीत करण्यात आली आहे. कुटुंबबप्रमुखाचे नाव व दूरध्वनी क्रमांक सरकारने या सर्वेक्षणातून संकलीत केल्याने या माहितीचा उपयोग सरकारला यापुढे थेट संवादासाठी होणार आहे.
पणजी लगत मंत्रालय, विधानसभा संकुल, सचिवालय आणि महत्वाची सरकारी कार्यालये असलेल्या पर्वरी पठारावरील कोविड १९ आरोग्य सर्वेक्षणाला जनतेने मोठा प्रतिसाद दिला. या भागात प्रामुख्याने सरकारी वसाहती आहेत. प्राप्तीकर खाते, टपाल खाते, बीएसएनएल, गोवा सरकार आणि सरकारचे पोलिस खाते या खात्यांच्या वसाहतींत केलेल्या सर्वेक्षणात नागिराकांनी स्वतःहून या सर्वेक्षकांना माहिती दिली.
सर्वेक्षक आले तेव्हा काही जण जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर गेले होते. ते आल्यानंतर शेजाऱ्यांनी सर्वेक्षकांना कऴवून बोलावून घेऊन माहिती संकलन करण्यास मदत केली. चार जणांचे एक पथक अशी दोन पथके या परिसरात कार्यरत होती. दोन दिवसात त्यांनी शंभर टक्के घरांना भेटी दिल्या. या कर्मचाऱ्यांत किशन साळगावकर, प्रा. राजेश पर्वतकर, रुपाशी प्रभू, सुवर्णा सरमळकर, करिश्मा साळगावकर, भानुदास हुम्रस्कर, प्रतीक्षा बाडकर आणि स्मिता केरकर यांचा समावेश होता. हे कर्मचारी स्थानिक असल्याने अनेकांच्या परिचयाचे होते त्यामुळे त्यांना माहिती संकलन करणे सोपे झाले. काहींनी आपली माहिती आधीच कागदावर उतरवून ठेवली होती. ती सर्वेक्षक आल्यानंतर वाचून दाखवली.
 

संबंधित बातम्या