...तर उन्हाळी सुट्टीतही न्यायालय सुरू!

dainik gomantak
गुरुवार, 23 एप्रिल 2020
   ...तर उन्हाळी सुट्टीतही न्यायालय सुरू!   

पणजी,

देशात लॉकडाऊन आल्यापासून उच्च न्यायालय व इतर जिल्हा व सत्र न्यायालयांमधील कामकाज काही महत्त्वाची प्रकरणे वगळता बंद ठेवण्यात आले आहे. येत्या ३ मे नंतर लॉकडाऊन उठविल्यास उन्हाळ्याची सुटी न घेता हे कामकाज ७ जूनपर्यंत घेतले जाईल, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या जनरल रजिस्ट्रारनी जारी केला आहे. हे कामकाज सकाळी ९ ते दुपारी २.३० पर्यंत सुरू राहील व यामध्ये अर्धातास सुट्टी असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या लॉकडाऊनच्या काळात न्यायालयीन कामकाज बरेच तुंबले आहे. काही प्रकरणांमध्ये न्यायालयीन सुनावणी गरजेची असतानाही ती स्थगित ठेवण्यात आली आहे. जी प्रकरणे अति महत्त्वाची आहेत तीच सुनावणीसाठी उच्च न्यायालयात तसेच जिल्हा व सत्र न्यायालयात घेण्यात येत आहेत. ही सुनावणी उच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली जात आहे. त्यासाठी लॉकडाऊनच्या मार्गदर्शक तत्त्वे पाळण्यात येत आहेत. काही प्रकरणांवरील सुनावणी अंतिम टप्प्यात आहेत व त्यावरील आदेश व निवाडेही देण्याचे बाकी राहिले आहेत. लोकांना वेळेत न्याय मिळावा यासाठी हे न्यायालयीन कामकाज उन्हाळ्याच्या सुट्टीतही सुरू ठेवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा प्रयत्न आहे. त्यामुळे न्याय प्रतिक्षेत असलेल्या अनेकांना दिलासा मिळू शकतो.
उच्च न्यायालयाची सुट्टी एरव्ही मे महिन्यात सुरू होते व ती जून महिन्यापर्यंत असते. सध्या उच्च न्यायालये, जिल्हा व सत्र न्यायालये तसेच प्रथमश्रेणी न्यायालयाने महत्त्वाच्या प्रकरणांसाठीच सुनावणी घेत आहे व त्याला आवश्‍यक असलेला कर्मचारी वर्गच बोलवला जात आहे. वकिलांनाही सुनावणीवेळी अटी घालण्यात आल्या आहेत. ज्याचे प्रकरण सुनावणीसाठी असेल त्या वकिलानेच न्यायालयाच्या सभागृहात उपस्थित राहण्यास मुभा आहेत. इतर वकिलांना सभागृहाबाहेर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त सामाजिक अंतर व तोडाला मास्क हे सक्तीचे करण्यात आलेले आहे.

संबंधित बातम्या