विर्नोडा येथे महामार्गाचे काम बंद

Dainik Gomantak
गुरुवार, 16 जानेवारी 2020

वळपे विर्नोडा, ओशालबाग या दोन गावांच्या सीमेवर सध्‍या चौपदरी मार्गाचे काम सुरू आहे. याठिकाणी काही अंतरापर्यंत राष्ट्रीय महामार्गाचा काही भाग कापून खोदकाम केले आहे.

प्रकाश तळवणेकर

पेडणे

विर्नोडा व ओशालबाग येथे होणारे बहुतांश अपघात हे चौपदरी मार्गाचे बांधकाम करीत असताना होत आहेत. येथे वळण व वाहतुकीसाठी अरुंद रस्ता हे एक मुख्य कारण असून आणखी अपघात टाळण्‍यासाठी त्वरित उपाययोजनेची गरज आहे. मंगळवारी विर्नोडा येथील ज्ञानेश्वर नाईक यांचा बळी गेल्यानंतर बुधवारी विर्नोडा व ओशालबाग परिसरातील महामार्गाचे काम बंद ठेवण्यात आले होते.
वळपे विर्नोडा, ओशालबाग या दोन गावांच्या सीमेवर सध्‍या चौपदरी मार्गाचे काम सुरू आहे. याठिकाणी काही अंतरापर्यंत राष्ट्रीय महामार्गाचा काही भाग कापून खोदकाम केले आहे. पूर्वीच्या मार्गापासून चौपदरी मार्गासाठी करण्यात येणारे काम हे सुमारे आठ फूट खोल आहे. या ठिकाणी वळण आहे व त्यातच येथे सध्‍या अरुंद अशा मार्गावरुन वाहनांना प्रवास करावा लागतो. येथे चौपदरी मार्गाचे काम सुरू झाल्यानंतर या मार्गाची स्‍थिती कशी आहे याची कल्पना येत नसल्याने बरेच वाहनधारक वेगात येतात.
येथे वळण व अरुंद रस्ता असल्याने अपघात होतात. शनिवारी कार व मोटरसायकल यांच्यात येथे अपघात होवून मोटारसायकलवरील दोघेही युवक गंभीररीत्या जखमी झाले असून इस्पितळात उपचार घेत आहेत. या व्यतिरिक्त येथे गेल्या पंधरावड्यात बरेच लहान मोठे अपघात झाले आहेत. त्यावर उपाययोजना म्हणून एका बाजूचे चौपदरी बांधकाम पूर्ण होईपर्यंत या परिसरात वाहने कमी वेगाने वाहतूक करतील यासाठी पोलिस तैनात ठेवावेत. रात्रीच्या वेळी चालकांना सावध करण्यासाठी तांबड्या दिव्याची सोय करणे गरजेचे असून चौपदरी मार्गाचे काम लवकर पूर्ण करण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या