ध्येय प्राप्तीसाठी संघटन,नियोजनाचे बळ आवश्‍यक:आमदार प्रवीण झांट्ये

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

डिचोली:सर्वण फ्रेंडस्‌ सर्कलच्या भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचा दिमाखात शुभारंभ

डिचोली:सर्वण फ्रेंडस्‌ सर्कलच्या भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचा दिमाखात शुभारंभ
जिद्‌द आणि चिकाटीला संघटन तसेच योग्य नियोजनाचे बळ मिळाले, तर कोणतीही ध्येयप्राप्ती सहज शक्‍य असते.सर्वण फ्रेंडस्‌ सर्कल क्रीडा आणि सांस्कृतिक संघटनेने एकजुटीचा संदेश देतानाच ही किमया करुन दाखवली आहे. सर्वणसारख्या ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या आणि एकोप्याचे दर्शन घडवणाऱ्या या संघटनेचे गेल्या पंचवीस वर्षातील क्रीडा आणि संस्कृती संवर्धन क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असे आहे. असे प्रतिपादन मयेचे आमदार आणि फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण झांट्ये यांनी गुरुवारी (ता.16) रात्री सर्वण येथे बोलताना केले. सुसज्ज आणि उत्कृष्ट दर्जाचे मैदान तयार करुन भव्यदिव्य अशी व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित केल्याबद्‌दल आयोजक संघटनेची आमदार झांट्ये यांनी तोंडभरुन स्तुती केली.या संघटनेने आपले कार्य असेच अखंडीतपणे चालूच ठेवावे. असे आवाहनही त्यांनी केले.सर्वण फ्रेंडस्‌ सर्कल क्रीडा आणि सांस्कृतिक संघटनेने रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्यात आमदार झांट्ये प्रमुख पाहूणे या नात्याने बोलत होते.
यावेळी लाटंबार्सेचे जिल्हा पंचायत सदस्य संजय शेट्ये, समाजसेवक रोहन सावईकर, कारापूर-सर्वणची सरपंच सुषमा सावंत, पंच रमेश सावंत, देवस्थान समितीचे तुळशीदास सावंत, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. एन.सी.सावंत, सचिव प्रा. प्रवीण सावंत, सल्लागार रायू सावंत, कार्यकारी समितीचे अध्यक्ष विद्याधर सावंत, खजिनदार दत्ताराम सावंत, सचिव सातू बी. सावंत, विवेक सावंत, भिकाजी सावंत आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.संजय शेट्ये, रोहन सावईकर, सुषमा सावंत आणि रमेश सावंत यांनी यावेळी बोलताना सर्वण फ्रेंडस्‌ सर्कलच्या कार्याची स्तुती करताना स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. डॉ. एन.सी.सावंत यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात संघटनेच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला. सर्वण फ्रेंडस्‌ सर्कलने आपले कार्य असेच चालू ठेवावे.असे आवाहन रायू सावंत यांनी केले. स्वागत प्रा. प्रवीण सावंत यांनी केले.सूत्रसंचालन नदीम यांनी केले. तर विद्याधर सावंत यांनी आभार मानले.
सुरवातीस मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलीत करुन कार्यक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले.नंतर प्रमुख पाहूणे आमदार झांट्ये यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून व्हॉलीबॉल स्पर्धेचे दिमाखात उद्‌घाटन करण्यात आले. समर व्हॉरियर्स आणि कुलमाया क्‍लब यांच्यात स्पर्धेचा शुभारंभी सामना झाला. यात कुलमायाने बाजी मारली. स्पर्धेच्या शुभारंभीच क्रीडाप्रेमींनी गर्दी केली होती. मैदानासभोवताली उभारण्यात आलेला स्टॅण्ड खचाखच भरला होता. उद्‌घाटन सोहळ्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वरुप प्राप्त झाले होते. येत्या रविवारी (ता.19) रात्री 8 वा. स्पर्धेचा अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे.

ड्रग्सचे खापर मुख्यमंत्री पोलिसांवर फोडू नका

संबंधित बातम्या