महमार्गासाठी घरे गेलेल्यांचे पुनवर्सन करणार  

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

महामार्गासाठी घरे पाडलेल्या
कुटुंबांचे करणार पुनर्वसन

बांधकाममंत्री पाऊसकर यांचे आश्‍वासन

पणजी :  कोलवाळ येथील महामार्गाच्या रुंदीकरणासाठी ज्यांची घरे पाडण्यात आली आहेत त्यातील फक्त दोनच कुटुंबाचे पुनर्वसन झालेले नाही ते केले जाईल. तसेच या महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणामध्ये आणखी १७ घरे येतात त्यांच्यासाठी पेडणे, कोलवाळ, धारगळ येथे जागा पाहण्यात आली आहे तेथे त्यांना पर्यायी भूखंड दिले जातील, असे आश्‍वासन बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी शून्यतासावेळी दिले.

थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी कोलवाळ येथील महामार्गाच्या चौपदरी रुंदीकरण्यासाठी सरकारने भूसंपादन केले त्यावेळी दहा घरे पाडण्यात आली. त्यातील आठजणांना पर्यायी जागा देण्यात आली होती तर दोघांच्या नावावर ते राहत असलेली जागा नसल्याने काही तांत्रिक कारणामुळे जागा देण्यात आलेली नाही. काही घरांचा भाग या रस्त्यासाठी गेला आहे. गेली तीन वर्षे याचा पाठपुरावा करत आहे तसेच अधिकाऱ्यांसोबत तपासणीही केली. कुटुंबांना घरे खाली करण्याची नोटीस देण्यात आली तेव्हा पर्यायी जागा दिली जाईल अशी आशा होती. अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यास ते उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ज्या कुटुंबांची घरे या महामार्ग रुंदीकरणासाठी हटविण्यात आली आहेत त्यांना पर्यायी जागा देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी सभागृहात द्यावे अशी विनंती आमदार हळर्णकर यांनी केली.

उर्वरित दोघांच्या पुनर्वसनासाठी मंजुरी घेणार
राष्ट्रीय महामार्ग ६६ हा कोलवाळ येथील रस्त्याचा विषय महत्त्वाचा आहे. पूर्वीच्या फक्त दोन घरांचाच विषय होता. १९८१ मध्ये जुन्या भू संपादनप्रमाणे दहा घरे होती. त्यातील ८ जणांचे पुनर्वसन झाले आहे. उर्वरित दोघांच्या पुनर्वसनासाठी मंजुरी घेण्यात येईल. आणखी १७ कुटुंबांचेही पुनर्वसन करताना त्यांना कोलवाळ, धारगळ, पेडणे येथे पाहिलेल्या जागेत भूखंड दिला जाईल, असे त्यांनी आश्‍वासन दिले.

 

 

 

 

संबंधित बातम्या