तासाला २५ नव्‍हे, १७० ट्रक कसे?

Dainik Gomantak
सोमवार, 27 एप्रिल 2020

ग्रामस्थांनी वाहतूक करणारे ट्रक मोजले, तेव्हा तासाला २५ नव्‍हे, तर तब्‍बल १७० खनिजवाहू ट्रक धावत असल्याचे दिसून आल्‍याची माहिती रुपेश वेळीप यांनी दिली.

पणजी

 केपे तालुक्यातील कावरे गावात अमर्याद खनिज वाहतूक सुरू आहे. त्याचा त्रास ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांना भोगावा लागत आहे. नागरिकांचे आरोग्य त्यामुळे धोक्यात आल्याचा आरोप ‘गाकुवेध’ या आदिवासी कल्याणासाठी झटणाऱ्या संघटनेने केला आहे. ग्रामस्थांनी वाहतूक करणारे ट्रक मोजले, तेव्हा तासाला २५ नव्‍हे, तर तब्‍बल १७० खनिजवाहू ट्रक धावत असल्याचे दिसून आल्‍याची माहिती श्री. वेळीप यांनी दिली. त्‍यामुळे संतप्‍त झालेल्‍या कावरेवासीयांनी खनिज वाहतूक रोखून धरली.
‘गाकुवेध’चे सरचिटणीस रुपेश वेळीप यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरवातीला तासाला केवळ २५ ट्रक खनिज वाहतूक करतील, अशी सरकारची भूमिका होती. प्रत्यक्षात खनिज वाहतुकीवर कोणाचेही नियंत्रण नाही. टाळेबंदीच्या काळात सरकारी यंत्रणेचे पूर्ण लक्ष ‘कोविड -१९’ विरोधातील लढ्यावर एकवटल्याचा फायदा घेत अमर्याद खनिज वाहतूक सुरू करण्यात आली आहे. ‘कोविड-१९’ विषाणूमुळे श्वसनाशी संबंधित आजार होतो. अमर्याद खनिज उत्‍खननामुळे माती नाका तोंडात जाऊन तसाच आजार कावरेवासियांनी होण्याची शक्यता वर्तविण्‍यात आली आहे.
खाणींना कावरेवासियांचा विरोध आहे. दशकभरापूर्वी कावरेवासियांनी बंद असलेल्या खाणीला बेकायदेशीरपणे सुरू करण्यासाठी परवानगी दिली म्हणून पणजीतील खाण खात्याच्या मुख्य कार्यालयात धाव घेतली होती. त्यांनी खाण संचालकांना त्यांच्या कक्षाबाहेर पडू दिले नव्हते. अखेर रात्री खाण बंद केल्याचा आदेश खाण संचालकांना द्यावा लागला होता. तेच कावरेवासीय आता अमर्याद खनिज वाहतूक रोखण्यासाठी पुढे सरसावले आहेत.

कावरेवासीय का भडकले?
खनिजवाहू दोन ट्रकांची स्पर्धा लागली. ते एकमेकांना बाजू देत पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागल्यावर ग्रामस्थांना पुन्हा एकदा बेदरकार खनिज वाहतुकीचे आपणास बळी व्हावे लागणार याची कल्पना आली. त्यामुळे त्यांनी ती वाहतूक रोखली. दोन तास वाहतूक रोखून धरल्यानंतर केपे पोलिसांनी धाव घेत ग्रामस्थ, पंचायत यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन देत वाहतूक सुरू करण्यास ग्रामस्थांना राजी केले. ‘माईनस्केप’ आणि अगरवाल यांच्या खाणपट्ट्यातील खनिजाची ही वाहतूक केली जात आहे.

नियमांचे पालन व्‍हावे
केपे पोलिसांनी ग्रामस्‍थ, पंचायत यांच्‍या घेतलेल्‍या संयुक्त बैठकीत पंच महेश वेळीप, राजेंद्र फळदेसाई, योगेश गावकर, समीर गावकर, प्रवास वेळीप आणि रवींद्र वेळीप सहभागी झाले होते. बैठकीत पोलिस निरीक्षक संतोष देसाई यांनी खाण कंपन्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतुकीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार परवानगी दिल्याचे सांगितले. मात्र, खाण कंपन्यांचे प्रतिनिधी तशी कोणतीही परवानगी सादर करू शकले नाहीत. खाण खात्याने खनिज वाहतुकीसाठी लागू केलेले नियम आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने घातलेल्या अटी यांचे पालन होत नसल्याकडेही ग्रामस्थांनी पोलिसांचे लक्ष वेधले. त्यानंतर खाण कंपन्यांनी सर्व नियमांचे सक्तीने पालन करावे अशी सूचना पोलिसांनी केली.

संबंधित बातम्या