पर्यटनमंत्री एवढे असंवेदनशील कसे?

Dainik Gomantak
सोमवार, 30 डिसेंबर 2019

पणजी

पणजी

सनबर्न क्लासिक महोत्सवादरम्यान तीन पर्यटकांचा मृत्यू झाला, याचे कोणतेही दुःख पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांना नाही. पर्यटनमंत्री काल वागातोर येथे सनबर्न महोत्सवात नाचतानाची चित्रफीत सार्वत्रिक झाली आहे. यावरून मंत्री कोणता संदेश देऊ इच्छीतात अशी विचारणा महिला काँग्रेसच्‍या प्रदेशाध्यक्ष ॲड. प्रतिमा कुतिन्हो यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.
त्या म्हणाल्या, ‘बेटी पढाव, बेटी बचाव’ असा नारा सरकार देत आहे. पण, मरण पावलेल्‍या पर्यटकांनाही आई, पत्नी, बहिण असेल एवढी संवेदनाही सरकारकडे नाही. दुर्घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी राज्याच्या उपमुख्यमंत्र्याने तेथे जाऊन नृत्य करावे यातून सरकारची असंवेदनाच उघड झाली आहे. अशा घटनांमुळे गोव्याचे नाव बदनाम होत आहे याचेही मंत्र्यांना काही पडून गेलेले नाही. उपमुख्यमंत्री सनबर्न क्लासिकच्या ठिकाणी जाऊन नाचले यावरून त्यांचे आयोजकांशी असलेले घनिष्ट नाते (ते कशासाठी हे काही वेगळे सांगायला हवे का?) उघड झाले आहे. त्यांना खरेतर आता सनबर्न क्लासिकचे ब्रॅण्ड ॲम्बासिडर केले पाहिजे. मढ्याच्या डोक्यावरील लोणी खाणारे लोक कसे असतात हे यातून दिसते. पर्यटनमंत्री म्हणून ते बेजबाबदार वागले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याचेही सौजन्यही त्यांनी दाखवलेले नाही.

अशोभनीय कृतीचा निषेध
उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्तीने एका खासगी आयोजकाच्या महोत्सवात जाऊन जाहीरपणे नृत्य करणे हे गोमंतकीयांसाठी शरमेची बाब आहे आणि त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे, असे कुतिन्‍हो म्‍हणाल्‍या. आम्ही पर्यटनवृद्धीच्या विरोधात नाही. असे महोत्सवही आयोजित करा, पण अमली पदार्थांचा वापर खुलेआम होता कामा नये. पर्यटन व्यवसाय घटत आहेत आताच अशा गोष्टी रोखल्या नाहीत तर गोव्याचे नाव आणखी बदनाम होण्यापासून वाचणार नाही. तीन जणांचा मृत्यू झाल्याने त्यांची चर्चा झाली पण अनेकांना तेथून अत्यवस्थ स्थितीत हलवले आहे. शेकडो मोबाईल, दागिने, पैशांची पाकिटे, हेल्‍मेटही चोरीला गेली आहेत. तेथे कायदा व्यवस्थेची काय स्थिती होती हे यावरून दिसते.

व्‍हिसेरा कधी पाठवणार...
प्रवक्ते ट्रोजन डिमेलो म्हणाले अमली पदार्थ व्यवहार वाढत आहेत. त्यातून निर्माण होणारा निधी सत्ताधाऱ्यांकडे जातो असा आरोप राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डनेच केला आहे. पिसुर्ले येथे शंभर किलो अमली पदार्थ सापडले होते, तेव्हाही सरकार अमली पदार्थ नाहीत असे सांगत होते. आताही तेच सांगत आहे. तरीही पिसुर्लेतील त्या कारखान्याचा गाळा औद्योगिक विकास महामंडळाने जप्त केला नाही. कोणत्याही नमुना तपासणीसाठी उशिरा पाठवला तर त्यांचा तपासणीचा अहवाल व्यवस्थित येईल याची खात्री नसते. त्यामुळे मृत्यू पावलेल्या पर्यटकांचा व्हिसेरा तपासणीसाठी कधी पाठवणार हाही प्रश्न त्याचमुळे महत्त्वाचा आहे. यावेळी एनएसयुआयचे प्रभारी जनार्दन भंडारी, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर, प्रवक्ते अमरनाथ पणजीकर हे उपस्थित होते.

संबंधित बातम्या