इंसान डरेगा इंसान से... पता नही था..!

Dainik Gomantak
गुरुवार, 16 एप्रिल 2020

आपल्याकडे काहीजण ‘गोंयकार’पणाचा टेंभा मिरवत असले तरी परप्रांतातून आलेल्या मजुरांवरच आपण बहुतांशी अवलंबून आहोत, हे सत्य मान्य करायला हवे. आज हाच मजूरवर्ग संकटात आहे. त्यांना आपण धीर द्यायला हवा.

किशोर शेट मांद्रेकर

कोविड १९ ने आपल्याला स्वयंशिस्त किती महत्त्वाची असते हे शिकवले. नाहीतरी कोणतीही गोष्ट गांभीर्याने न घेता ती सहजच घेण्याची सवय आपल्या अंगवळणी पडली आहे. या मानसिकतेतून कधीतरी बाहेर पडावे लागणार होते. ते काम कोविडने केले आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्स (समाज अंतर) पाळायलाच हवे. सर्वांत प्रथम ही गोष्ट आवश्‍यक आहे. या साथीच्या आजारावर अजूनही ठोस उपाय सापडलेला नसल्याने ‘काळजी घेणे’ हेच एक चांगले औषध आहे, असे म्हणावे लागेल. तरीसुध्दा यातून भयंकर अशी एक दुसरी बाजूही समोर आली आहे आणि ती म्हणजे, ‘माणूसच माणसाला घाबरू लागला आहे...’
जगभर हाहाकार माजवणाऱ्या या जीवघेण्या विषाणूमुळे सगळ्यांच्याच मनात भीती दाटली आहे. पण जीवनात अशी संकटे येत असतात. त्यांना धाडसाने सामोरे जाणे आणि योग्य ती दक्षता बाळगणे यातूनच आपण सावरू शकतो. केंद्र सरकारने टाळेबंदी आणखी १९ दिवस वाढवली आहे. म्हणजे आता ३ मे पर्यंत आपल्याला घरात बसून राहावे लागणार आहे. परंतु जिथे कोविडचे रुग्ण मागील काही दिवसांत सापडले नसतील तर त्या विभागात २० एप्रिलनंतर टाळेबंदीत काहीशी सूट मिळू शकते. सुदैवाने गोव्यातील स्थिती चांगली आहे. सातपैकी सहा  रुग्ण निगेटिव्ह ठरल्याने ते धोक्‍याच्या बाहेर आले आहेत. उर्वरीत रुग्णाची तब्बेतही सुधारत असल्याचे आरोग्य खाते सांगत आहे. काही संशयित रुग्ण असले तरी त्यांच्या चाचण्यांतून चिंता करण्यासारखे अजून तरी काही जाणवले नाही. यामुळे राज्यात आणखी रुग्ण नसावेत, असे आपण गृहित धरायला हरकत नाही. संशयित रुग्णसंख्याही हळूहळू आटोक्‍यात येईल. यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. कामाशिवाय बाहेर पडू नये. जर आपल्याला बाहेर पडावे लागलेच तर आवश्‍यक ती दक्षता बाळगायला हवी. मास्क वापरायला हवा. आपण जिथे जातो तिथे समाज अंतर राखले पाहिजे. हात सॅनिटायझरने धुतले पाहिजेत. गर्दीत जाणे टाळायला हवे. सध्या वाहनांची रस्त्यावरील वर्दळ फारच कमी असल्याने, कारखाने बंद असल्याने हवेतील वातावरणही चांगले आहे. प्रदूषण कमी झालेले आहे. निसर्ग मोकळा श्‍वास घेत आहे. हे वातावरण आल्हादायक वाटत असले, सुखावणारे असले तरी समाजजीवनाचे चक्र असे एकाएकी थांबून चालणार नाही. तसे झाले तर समाजावर फार मोठे परिणाम होतील. आर्थिक डोलारा कोलमडेल. यातून सावरण्यासाठी उद्योगधंदे, व्यापार, इतर कामधंदे सुरू व्हायला हवेत. कोविडमुळे टाळेबंदी लागू झाल्यानंतर आपण बरेच काही शिकलो आहे. त्यामुळे जीवनचक्रासाठी आवश्‍यक गोष्टी या सुरू व्हायला हव्यात याबाबत कोणाचेही दुमत नसावे. पण आरोग्यही तेवढेच महत्त्वाचे. आपण जगलो तर पुढचे सर्व काही सुरळीत करता येईल. म्हणूनच सर्व गोष्टी या हळूहळू टप्प्याटप्प्याने मार्गी लागतील यासाठी सर्वांनी सहकार्य करायला हवे.
आपल्याकडे काहीजण ‘गोंयकार’पणाचा टेंभा मिरवत असले तरी परप्रांतातून आलेल्या मजुरांवरच आपण बहुतांशी अवलंबून आहोत, हे सत्य मान्य करायला हवे. आज हाच मजूरवर्ग संकटात आहे. त्यांना आपण धीर द्यायला हवा. शक्‍य तेवढी मदत करायला हवी. राज्य सरकारने कामगार कल्याण निधीचा वापर करून सुमारे साडे आठहजाराहून अधिक कामगारांना प्रत्येकी सहा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य केले आहे. कोविडच्या दहशतीने हे मजूर बिथरलेले आहेत. आपल्या गावी परतण्यासाठी आतूरलेले आहेत. पण सध्यातरी त्यांचे परतीचे मार्ग बंद आहेत. हे सर्वजण माघारी फिरले तर गोव्यात मजुरांअभावी अनेक कामे खोळंबणार आहेत. हे वास्तव लक्षात घेऊन प्रत्येकाने मजुरांचाही विचार करायला हवा.
कोविडचा धसका आपण सर्वांनीच घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे संशयाने पाहण्यात येत आहे. आपल्या कुटुंबातील सदस्य बाहेर अत्यावश्‍यक सेवेत असेल तर त्याचा कोठे कोविड बाधित रुग्णांशी संपर्क आला नसेल ना, अशीही संशयाची पाल काहीजणांच्या मनात चुकचुकत आहे. समोरील परिस्थितीच अशी आहे की त्यामुळे ही वेळ आली आहे, असे म्हणावे लागेल. आपला शेजारी, सहकारी, मित्र, वाड्यावरील व्यक्ती कोविड बाधिताच्या संपर्कात आली नव्हती ना, असे एक ना अनेक प्रश्‍न बहुतेकांच्या मनात घर करत आहेत. यातून प्रत्येकाकडे पाहण्याची नजर बदलली आहे. त्यात मजूर तर दूरची गोष्ट. त्यांची गरज कामासाठी असते पण त्यांच्याकडे पाहताना अनेकांच्या मनात एरवीही स्वच्छतेबाबत एक गहन प्रश्‍न असतोच. यामुळे मजुरांना आपले मानण्याचे सोडाच, ते जवळही फिरकणार नाहीत, यावर काहीजण लक्ष ठेवून आहेत.
परराज्यातील काही जण येथे कामधंद्यानिमित्त राहतात. भाडेकरू म्हणून ते ज्या घरांमध्ये राहतात तेथेही बऱ्याचजणांना "उपरे' असल्याची जाणीव करून दिली जात आहे. घराबाहेर पडू नये. नाहीतर घर, खोली सोडावी लागेल, असे इशारे दिले जात आहेत. पण कुठे वाच्यता केली तर आहे ते घरही सोडावे लागेल आणि उघड्यावर पडण्याची वेळ येईल म्हणून काही जण मुकाट्याने मन घट्ट करून राहिले आहेत. त्यांना "तोंड दाबून मुक्‍क्‍यांचा मार' सहन करण्याशिवाय गत्यंतर नाही. सरकारने भलेही भाडेकरूंचे एक महिन्याचे भाडे घरमालकांनी माफ करण्याचा आदेश काढला असेल. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तसे आवाहन पुन्हा पुन्हा केले असेल, तरीही वस्तुस्थिती वेगळी आहे. सद्यस्थितीत कर्णासारखा उदार कोणी असेल तर तो एक दुर्लभ अपवादच...
कोविडने सर्वांनाच असे आपल्यापासून वेगळे केले आहे. कोणी ते चेहऱ्यावर दाखवून देत नसले तरी माणूस माणसाला पोरका होत असल्याचे जाणवल्याशिवाय राहत नाही. यातून माणुसकी हरवली वगैरे म्हणावे की परिस्थितीला दोष द्यावा..?. पण प्रत्येकाच्या मनात एक अदृश्‍य भीती दाटली आहे ती त्याला दुसऱ्याचा विचार करायला देत नाही. दुसऱ्यांना मदत करण्याची भले कितीही इच्छा असली तरी काही जणांना "लक्ष्मणरेषा' अडवत आहे. आपण कोविडच्या जाळ्यात अडकलो तर... असे म्हणत अनेकांनी आपण बरे आणि आपले घर भले... असे म्हणत गरजवंतांसाठी ‘चार हात’ लांब राहणे पसंत केले आहे. तरीसुध्दा माणुसकीचा धर्म राखणारेही या समाजात आहेत, आणि ते आपल्या जीवाची पर्वा न करताही झटत आहेत, हा अनुभव मनाला सुखावणारा आहे. समाज अंतर राखण्याचे आवाहन पंतप्रधानांपासून मुख्यमंत्री आणि डॉक्‍टरांपासून सेवाभावी लोकांकडून केले जात आहे. हे समाज अंतर दक्षता म्हणून राखायचे आहे. समाज अंतराचा अर्थ वेगळा काढून आपल्या कुटुंबियांशी, शेजाऱ्यांशी, सहकाऱ्यांशी असलेली जिव्हाळ्याची नाळ काही काळ तोडावी असे नव्हे. पण जगभरात असे विदारक अनुभव येत आहेत. प्रसारमाध्यमांतून ते वाचायला, पाहायला मिळत आहे. तेच कशाला आपल्या राज्यातही ‘होम क्वारंटाईन’ म्हणजेच घरी विलगीकृत असलेल्यांबाबतही वेगळी चर्चा होताना कानावर पडते. कोविडची बाधा होऊ नये यासाठी काळजी म्हणून विलगीकृत राहण्याची खबरदारी घेतली जात असते एवढेच. पण अशा विलगीकृत व्यक्तीविषयीही भलताच संशय घेऊन जणू त्यांना वाळीत टाकल्यागत वागण्याचा अनुभवही काही ठिकाणी आला आहे. एवढ्या टोकाच्या विचारापर्यंत आपण कसे जाऊ शकतो?, याचा विचार केला की मन अगदी विषण्ण बनते. आपण कोविडचा केवढा धसका घेतला आहे हे एका हिंदी कवितेतून जाणवल्याशिवाय राहत नाही.

‘कुदरत का कहर भी जरूरी था साहब, वरना हर कोई खुद को खुदा समझ रहा था
जो कहते थें कि मरने तक की फुरसत नहीं है, वे आज मरने के डर से फुरसत में बैठे हैं
माटी का संसार है, खेल सके तो खेल, बाजी रब के साथ है, पुरा विज्ञान फेल
मशरूफ थे सारे अपनी जिंदगी की उलझानों मे, जरा सी जमीन क्‍या खिसकी कि सबको ईश्वर याद आ गया...
ऐसा भी आएगा वक्त पता नहीं था, इंसान डरेगा इंसान से ही पता नही था...!

 

ReplyForward

संबंधित बातम्या