मानव अधिक चांगला बनेल : डॉ. सेल्सेल्टिका

Dainik Gomantak
शनिवार, 25 एप्रिल 2020

``दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मी युवा होते. तेव्हा रेशन मिळविण्यासाठी मोठ्या रांगा लागायच्या. शेजाऱ्यांशी जीवनावश्यक वस्तूंचे देणे-घेणे असायचे. महायुद्धाच्या गोष्टी पालकाकडून किंवा रेडिओद्वारे ऐकायला मिळायच्या,`` असे भूतकाळात रमताना डॉ. सेल्सेल्टिका यांनी सांगितले.

पणजी कोरोना विषाणू महामारीनंतर मानव अधिक चांगला बनेल. या भीतीदायक रोगापासून मुक्ती मिळविण्यासाठी सर्वांनी प्रार्थना करणे आवश्यक आहे, असे मत भारतीय व्हेटरन बॅडमिंटनमधील `सुपरवूमन` ८२ वर्षीय डॉ. सेल्सेल्टिका रिबेलो यांनी व्यक्त केले आहे.

डॉ. सेल्सेटिका यांच्यासाठी वय म्हणजे फक्त आकडा आहे. कोरोना विषाणू महामारीमुळे जगाचा वेग मंदावला आहे, पण क्रीडापटू डॉ. सेल्सेटिका यांचा नित्यक्रम कायम आहे. ``माझ्या जीवनात फरक पडलेला नाही. दररोज सकाळी ६ वाजता उठते. त्यानंतर घर आणि इस्पितळ परिसरात चालणे खंडित झालेले नाही. माझ्या घरीच बॅडमिंटन कोर्ट आहे. तेथेच मी नित्यनेमाने सराव करते. या वयातही तंदुरुस्त राहण्याची आणि खेळण्याची अनुभूती अवर्णनीय आहे. बॅडमिंटन खेळल्यामुळे तंदुरुस्ती आणि मानसिक चपळता लाभते,`` असे मत मडगावातील नामवंत स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. सेल्सेटिका यांनी सांगितले. मडगाव कदंब बसस्थानकाजवळील डॉ. रिबेलो इस्पितळात त्या अजूनही कार्यरत आहेत.

डॉ. सेल्सेटिका यांनी गतवर्षी अखिल भारतीय मास्टर्स मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत गोव्याचेच डॉ. सतीश कुडचडकर यांच्यासमवेत खेळताना मिश्र दुहेरीत ब्राँझपदक जिंकले होते. लॉकडाऊनपूर्वी त्या फातोर्डा बहुउद्देशीय सभागृहात बॅडमिंटनच्या सरावासाठी जात. त्या १९६३ साली गोव्यात परतल्या. १९६७ साली त्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत महिला दुहेरीत विजेतेपद मिळविले, तेव्हा त्या तीन महिन्यांच्या गर्भवती होत्या. मात्र त्याचा परिणाम खेळावर अजिबात झाला नाही. उमेदीच्या काळात त्यांनी बॅडमिंटनसह टेबल टेनिस आणि एथलेटिक्समध्येही यश प्राप्त केले होते.

 

दुसऱ्या महायुद्धाची आठवण...

सध्याच्या लॉकडाऊनमुळे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील दिवसांची आठवण येते, असे डॉ. सेल्सेल्टिका यांनी सांगितले. ``दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मी युवा होते. तेव्हा रेशन मिळविण्यासाठी मोठ्या रांगा लागायच्या. शेजाऱ्यांशी जीवनावश्यक वस्तूंचे देणे-घेणे असायचे. महायुद्धाच्या गोष्टी पालकाकडून किंवा रेडिओद्वारे ऐकायला मिळायच्या,`` असे भूतकाळात रमताना डॉ. सेल्सेल्टिका यांनी सांगितले. कोरोना विषाणू महामारीस पराभूत करण्यासाठी योग्य पद्धतींचा वापर करायला हवा. प्रशासनाचे आदेश मानायला हवेत, असे त्यांनी नमूद केले. डॉ. सेल्सेल्टिका यांची मुलं अमेरिका, लंडनमध्ये स्थायिक आहेत. तेथे महापारीचे थैमान सुरू आहे. मुलांच्या काळजीने त्या व्यथित आहेत. त्याचवेळी कोरोना विषाणू वेगाने गायब झालेला पाहण्याची त्यांची इच्छा आहे.

 

संबंधित बातम्या